पुणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी, गणेशोत्सवानंतर म्हणजेच ३ सप्टेंबरपासून पीएमपीएमएलची बससेवा सुरू करण्यात येणार आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात २५ टक्केच म्हणजे ४२१ बसेस १३ डेपोंच्या माध्यमातून १९० मार्गांवर धावणार आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर १ जूनपासून शहरात नागरिकांची वर्दळ वाढली. मात्र ज्यांच्याकडे खाजगी वाहने नाहीत अशा चाकरमान्यांची व प्रवाशांची गैरसोय होत असल्याने, बससेवा सुरू करण्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेशोत्सवामध्येच बससेवा सुरू करण्याबाबत काहींनी मागणी केली.पण गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळावी याकरिता ३ सप्टेंबरपासूनच बससेवा सुरू करावी अशी भूमिका प्रशासनाने मांडली. या बैठकीस पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, दोन्ही महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने व संतोष लोंढे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप व आदी अधिकारी उपस्थित होते. ३ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या बसेसवेत महामंडळाकडील एकूण १३ डेपोच्या १९० मार्गांवर ४२१ बसेसचे संचालनाचे नियोजन आहे. शहरातील प्रमुख रस्ते उपनगरे येथे गर्दीच्या वेळी सकाळ / सायंकाळी पीएमपीएमएल शटल सेवा सुरू करण्यात येणार असून, अधिक गर्दीच्या मार्गांना या मध्ये प्राधान्य दिले गेले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आसन क्षमतेच्या ५०% प्रवाशांनाच सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी बसेसमध्ये सीटवर मार्कींग पेटींग करण्यात आलेले आहे. तसेच महत्वाचे स्थानकावर वर्तुळ पेंट करण्याचे काम सध्या सुरू आहे. -----------------------------------
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; शहरात ३ सप्टेंबरपासून धावणार पीएमपी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:21 AM
पहिल्या टप्प्यात २५ टक्केच म्हणजे ४२१ बसेस १३ डेपोंच्या माध्यमातून १९० मार्गांवर धावणार
ठळक मुद्देबससेवा सुरू करण्याबाबत महापौर दालनात गुरूवारी बैठक आयोजित