पुणे: राज्य शासनाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांची १११ पदे भरण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्याअखेर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध हाेईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्राध्यापक भरतीला सुरुवात हाेईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये ६५९ पदांवर प्राध्यापक भरती करण्यासंदर्भात दि. ७ ऑगस्ट २०१९ राेजी शासन निर्णय निर्गमित केला हाेता. मात्र, मे २०२० मध्ये पदभरती संस्थगित केली हाेती. काेराेना प्रादुर्भाव काळातील निर्बंध शिथिल केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा पदभरती सुरू करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला हाेता.
राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने आंदाेलने करण्यात आली. राज्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्राध्यापक, सहयाेगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या ७३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त जागांवर पदभरती केव्हा सुरू हाेणार? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
लवकरच पदभरतीची जाहिरात होणार
मागासवर्गीय कक्षाकडून प्रवर्गांच्या आरक्षणनिहाय पदांना मान्यता मिळाली आहे. सध्या समांतर आरक्षण प्रक्रिया निश्चितीचे काम सुरू आहे. विभागप्रमुखांकडून विषयांच्या स्पेशलायझेशनच्या संदर्भात माहिती घेतली जात आहे. लवकरच जाहिरातीचा अंतिम मसुदा तयार करून पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. - डाॅ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ