पुणे: राज्यात सहा महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक पदभरतीला अखेर सुरूवात झाली आहे. पवित्र पाेर्टल मार्फत शिक्षक अभियाेग्यता आणि बुध्दिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे स्व- प्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवार दि. १ पासून सुरूवात झाली आहे. येत्या १५ सप्टेंबर पर्यंत स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
शिक्षक अभियाेग्यता आणि बुध्दिमत्ता चाचणी २०२२ परीक्षा दि. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली. परीक्षेसाठी २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी परीक्षा दिली हाेती. या उमेदवारांना पवित्र पाेर्टल मार्फत स्व प्रमाणपत्र सुविधेला सुरूवात झाली आहे. त्याबाबत उमेदवारांना आवश्यक सुचना https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावरील पाेर्टलवर देण्यात आल्या आहेत.
स्व प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या रीक्त जागांची जाहिरात पाेर्टलवर प्रदर्शित केली जाईल. गुणवत्तेनुसार उमेदवारांचे पसंतीक्रम घेण्यात येतील आणि त्यानंतर निवड यादी तयार करून उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. मात्र, एकुण किती जागांवर पदभरती हाेईल त्याबाबत शिक्षण विभागाकडून अद्याप स्पष्टता दिलेली नाही.
टीईटीत गैरप्रकार केलेल्यांना संधी नाही
२०१८ आणि २०१९ मध्ये शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये गैरप्रकार केल्यामुळे परीक्षा परिषदेने प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना औरंगाबाद खंडपीठाने टेट २०२२ परीक्षा देता येत नसल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी हाेता येणार नाही. तसेच टेट- २०२२ परीक्षा एक वेळ देण्याची तरतूद आहे. मात्र, काही उमेदवारांनी एका पेक्षा जास्त वेळा टेट परीक्षा दिली आहे या उमेदवारांनाही सहभागी हाेता येणार नाही. तसेच दिसून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल असे शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट केले आहे.
शिक्षक भरती प्रक्रियाही नियमानुसार हाेणार
शिक्षक होण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. विविध संघटना आणि गटांनी विविध मागण्या मांडल्या होत्या आणि त्यातील काही विरोधाभासी होत्या. आम्ही विवादांचे समाधानकारक निराकरण केले आहे आणि तार्किकदृष्ट्या सुसंगत धोरण तयार केले आहे. टेट परीक्षा काेणत्याही त्रुटीशिवाय पार पडली. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियाही नियमानुसार हाेणार आहे. - सूरज मांढरे , शिक्षण आयुक्त
मुलांसाठी समर्पित भावनेने काम करा
शिक्षक हा पवित्र पेशा आहे. मुलांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा अभ्यास घ्यावा, ज्या शाळेवर नियुक्ती हाेईल त्या शाळेवर आणि गावावर प्रेम असले पाहिजे. गावातील मुले आणि भावीपिढीची जबाबदारी तुम्हा सर्वांवर असणार आहे. जी शाळेची निवड कराल त्यामध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी समर्पित भावाने काम करावे लागणार आहे. - दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री