बारामती : गेले वर्षभर बंद असलेली बी.डी.एस. प्रणाली अखेर सुरु झाली आहे. त्यामुळे शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतील त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने याबाबत सतत पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे.
बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी हि माहिती दिली. शिक्षकांना स्वत:चे आजारपण, मुलांचे शिक्षण, लग्न, घरबांधणी, घरदुरुस्ती याकरीता भविष्य निर्वाह निधीतून विना परतावा व परतावा कर्ज दिले जाते. सदर कर्ज मागणीस जिल्हा परिषदेची मंजुरी मिळाल्यानंतर मंजूर कर्ज रक्कम राज्य शासनाकडून बी. डी. एस. प्रणाली द्वारे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागास दिली जाते. त्यानंतर सदर रक्कम शिक्षकांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
गेले वर्षभर बी. डी. एस. प्रणाली बंद असल्याने अनेक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतून कर्ज मंजूर होऊनही राज्य शासनाकडून रक्कम न मिळाल्याने शिक्षकाना भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शिक्षकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. बी. डी. एस.प्रणाली सुरु व्हावी. याकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे व सरचिटणीस केशवराव जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा करीत होते.
यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले होते. तसेच अर्थ खात्याचे सचिव यांच्याकडे सात्यत्याने पाठपुरावा सुरु होता. २७ सप्टेंबरला राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे व सरचिटणीस केशवराव जाधव, राजू बालगुडे यांनी भेट घेऊन बी. डी.एस.प्रणाली लवकरात लवकर सुरु व्हावी अशी मागणी केली होती. त्यावेळी आयुक्तांनी बी. डी. एस.प्रणाली तातडीने सुरु करण्यासंदर्भात कार्यवाही करू अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार दिनांक २८ सप्टेंंबर रोजी बी. डी. एस. प्रणाली सुरु झाली. त्यामुळे गेले अनेक दिवस प्रलंबित असलेली भविष्य निर्वाह निधीतील मंजूर रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.