पुणे : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लागू केलेले सर्वच निर्बंध ( पहिली ते आठवीच्या शाळा वगळता) आता पूर्णपणे शिथिल केले गेले आहेत. त्यातच आता दिवाळीच्या तोंडावर शहरातील व्यापारी वर्गालाही पुणे महापालिकेने मोठी सुखद वार्ता देत, सर्व दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश बुधवारी जारी केले आहेत. सर्व व्यापारी दुकानांना रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी देतानाच, सर्व रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट यांनाही रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर महापालिकेने २२ ऑक्टोबरपासून अॅम्युझमेंट पार्क, संग्रहालयाचे दरवाजेही खुले करण्याचे आदेश देऊ केले आहेत. हे सर्व आदेश पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डालाही लागू राहणार आहेत.
शहरात एकीकडे कोरोनाबाधितांच्या सक्रिय रूग्णांचा आकडा एक हजाराच्या आत आला असताना बुधवारी एकही मृत्यूची नोंद झाली नाही़ दुसरीकडे आजपासून सर्व व्यवसायांची वेळ महापालिकेने वाढविल्याने, शहरातून कोरोना संसर्ग हद्दपार होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. यामुळे व्यापारी वर्गासह सर्वच स्तरात ऐन दिवाळीच्या तोंडावर आंनददायी वातावरण निर्माण झाले आहे.