पिंपरी : कोरोनाचे संकट असतानाही पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील टाटा मोटर्स कंपनीने ३५ हजार २०० रुपये बोनस जाहीर केला आहे. त्याचा लाभ सुमारे सात हजार कामगारांना होणार आहे. दिवाळीपूर्वी बोनस रक्कम मिळणार आहे.
टाटा कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यासमवेत नुकतीच ऑनलाइनच्या माध्यमातून बैठक झाली. या वेळी प्लॅन्ट हेड अशोक सिंग, जयदीप देसाई, सरफराज मणियार, रवी कुलकर्णी, युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, संतोष दळवी, अशोक माने, आबिदअली सय्यद उपस्थित होते.
............ बोनस संदर्भात तीन वर्षांसाठी धोरण बैठकीत वेतन आणि बोनससंदर्भात कंपनीचे तीन वर्षांसाठीचे धोरण ठरलेले आहे. कोरोनाच्या काळात कामगार कामावर आले नसले तरी एकही दिवसाच्या वेतनात कपात केली नाही. घरी राहणाऱ्या कामगारांना शंभर टक्के वेतन दिले, असे यावेळी सांगण्यात आले.
............... असे आहे बोनस सूत्र बिझनेस स्कोर कार्डचा आधार घेऊन बोनसचे सूत्र ठरविले आहे. त्यानुसार गेल्या वर्षी ३८ हजार २०० रुपये बोनस मिळाला होता. आताही ३५ हजारांहून अधिक रक्कम जाहीर झाली आहे. ती दसऱ्यापूर्वी कामगारांच्या हातात मिळणार आहे.
........
टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे म्हणाले, ''कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कोरोना संकटकाळात कामगारांच्या वेतनात एक रुपयादेखील कपात करणार।नाही हे जाहीर केले होते. त्यामुळे कामगारांना दिलासा दिला होता. आता बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे कामगाराची दिवाळी आनंदाची होणार आहे.''