पुणे : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी शहरातील पाचही विभागांसाठी तांत्रिक समिती तयार करण्यात येणार आहे. समितीतील सदस्यांची नावे आणि संपर्क क्रमांक जाहीर केले जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त या समितीवर लक्ष ठेवून असणार आहेत. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत अतिरिक्त आयुक्त स्वत: लक्ष घालणार आहेत, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.
शहरातील काही भागांमध्ये जास्त दाबाने, तर काही भागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांनी चित्तरंजन वाटिका आणि आयुक्त विक्रम कुमार यांच्या बंगल्यातील पाण्याच्या दाबाची तपासणी केली. आयुक्तांच्या बंगल्यात पाण्याचे प्रेशर चांगले आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला समान पाणीपुरवठा झाला पाहिजे, ही प्रशासकांची जबाबदारी आहे. त्यामुळेच महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील पाण्याच्या दाबाची तपासणी केली, असे बापट यांनी सांगितले. यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, नगरसेविका ज्योत्स्रा एकबोटे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, कमी कालावधीसाठी पाणी येणे यासंदर्भात कालवा समितीमध्ये मी विषय मांडला. तांत्रिक बिघाड झाल्यास कधीतरी पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होऊ शकते. मात्र, अपवाद वगळता सर्वांना समान पाणीपुरवठा झाला पाहिजे. एखाद्या भागात सहा तास, एखाद्या भागात दोन तास पाणी असे चालणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.