खळद : यंदा मृग, उत्तरापूर्वा, हत्ती नक्षत्रात चार खंडात पाऊस पडेल, जनतेचे समाधानकारक होईल, गाईगुरे, शेळी-मेंढी यांच्या मागची रोगराई हटेल; पण माणसाला मात्र साधारण रोगराईला सामोरे जावे लागेल, अशी भाकणूक रविवारी पंचामीच्या दिवशी श्रीक्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या वार्षिक यात्रेत देवाचे मानकरी तात्या बुरूंगले यांनी केली.श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे माघ शु.पौर्णिमेपासून श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या दहा दिवसांच्या वार्षिक यात्रेला सुरुवात झाली. रविवारपासून पंचमीच्या दिवशी भाकणुकीला, नवसाचे व कुलाचाराप्रमाणे गज-गोपाळ (जेवण) घालण्यास सुरुवात झाली. सोमवारपासून मारामारीपर्यंत तात्या बुरूंगले, दादा बुरूंगले, लक्ष्मण शिंगाडे यांची भाकणूक होईल.पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी ६ वाजता दर्शनासाठी तो पुन्हा खुला करण्यात आला. ११ वाजता विश्रांतीसाठी पुन्हा बंद करण्यात आला. ११.३० वा. दर्शनासाठी पुन्हा खुला करण्यात आला. एकच्या सुमारास मानाच्या कोडीत, कण्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई, सोनवडी या पालख्या व २२ काठ्या देऊळवाड्यात आल्या. यावेळी देवाची आरती होऊन सवाई सर्जाचं चांगभलंचा भव्य गजर झाला. ढोल-ताशांच्या गजरात पालखींची छबिण्याने मंदिर प्रदक्षिणेला सुरूवात झाली. एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर दुसºया प्रदक्षिणेदरम्यान मानकरी तात्या बुरूंगलेयांच्या अंगात देवाचा संचार झाला. तलवार खेळण्याचा कार्यक्रम झाला व यानंतर बुरूंगले यांनी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भाकणूक सांगितली.मृग नक्षत्रात चार खंडात चांगला पाऊस पडेल. जनतेचे समाधानकारक होईल. मृगाच्या वलीवर व आद्राच्या वाफेवर पेरणी होईल. जो पेरणी करेल तो शेरास सव्वा शेर उत्पन्न काढेल. आद्राचा पाऊस तीन खंडात पडेल, आश्लेषा - मघा नक्षत्रात दोन खंडात पाऊस पडेल. तर दोन खंडात दुपारचा पाहुणा येईल. उत्तरा -पूर्वा नक्षत्रातही चार खंडात पाऊस पडेल. हत्तीचा पाऊस चारही खंडात पडेल. एका कोपºयात दीड महिन्याचा खडा पडेल. एका कोपºयात सव्वा महिन्याचा खडा पडेल. एका कोपºयात एक महिन्याचा खडा पडेल. एका कोपºयात बळीच्या घासाला पुरायचे नाही. तर परतीला एका कोपºयात दीड शेर उत्पन्न निघेल. एका कोपºयात सव्वाशेर उत्पन्न निघेल. एका कोपºयात एक शेर उपन्न निघेल, एका कोपºयात दुष्काळ पडेल. गाई गुरांना शेळ्या-मेंढ्यांची रोगराई हटेल आणि मनुष्याच्या मागे मात्र खातापिता आटापिटा राहील. ज्याची गादी त्याला मिळेल. गादीचा मालक गादीवर येईल, अशी भविष्यवाणी या वेळी करण्यात आली.ही भाकणूक ऐकण्यासाठी देऊळवाड्याच्या परिसरात भाविक मिळेल त्या जागेवरच हात जोडून उभे होते. या वेळी सर्ववातावरण एकदम भक्तीमय झाले होते. भाकणूक संपताच पुन्हा दोन प्रदक्षिणा होऊन छबिण्याची सांगता झाली.
यंदाच्या वर्षी होणार चांगला पाऊस; रोगराई हटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:51 AM