पुणे : पुणे देशाची सांस्कृतिक राजधानी असल्याचे वाचले होते, पण गेल्या तीन वर्षांत याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पुण्याची भौगोलिक रचना, सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय कामात प्रचंड विविधता असल्याने येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याचा अनुभव ख-या अर्थाने समृद्ध करणारा ठरला. तसेच पुण्यात चांगल्या कामाचे कौतुक होते आणि चुकाल तर टीकाही तेवढीच होते, असे मत प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून बदली झालेल्या नवल किशोर राम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.नवल किशोर राम म्हणाले देशातील सर्वाधिक बुध्दीजीवी लोक पुण्यात राहतात. पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करताना लोकसभा व विधानसभा या दोन निवडणुका, भीमा कोरेगावचा हाताळलेला प्रश्न राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली, पुर परिस्थितीत आणि आताचे कोरोनाचे संकट सर्वच कामांचा अनुभव अधिक समृद्ध करणारा असल्याचे राम यांनी सांगितले. जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना खूप आनंद झाला. अनेक आव्हानात्मक प्रसंग आले. पण त्यातून लोकाभिमुख प्रशासन राबविण्यात यशस्वी झालो. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासन राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले. राम यांची नुकतीच प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून बदली झाली आहे, तत्पूर्व शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उप जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक कार्यालय, पुनर्वसन कार्यालय, राजशिष्टाचार कार्यालय, भूसंपादन शाखा, गृह शाखा, आपत्ती व्यवस्थापन, करमणूक कर शाखा, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र अशा विविध शाखांना भेट देवून कर्मचारी, अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत देखणी असून तिचे देखणेपण जपले गेले पाहिजे. येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे योग्य समाधान झाले पाहिजे, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या कार्यकाळात सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार मानून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
......जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छापुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, 'पीएमआरडीए'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पुण्याच्या प्रश्नांची जाण असणारे अधिकारी नवल किशोर राम यांना प्रधानमंत्री कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे, ही चांगली बाब असून पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी श्री. राम प्रयत्न करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.