पुणे : दहा दिवसांच्या मनोभावे सेवेनंतर आज अनंत चतुर्थ दिवशी लाडक्या गणरायाला सर्वत्र निरोप देण्यात येणार आहे.दरवर्षी पुण्यातली गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे जगभरातल्या गणेशभक्तांची उत्सुकता वाढवणारी आणि डोळ्यांची पारणे फेडणारी असते. मात्र, यंदा कोरोनाच्या धर्तीवर या सोहळ्यावर अनेक मर्यादा असून विसर्जन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कसबा गणपतीला हार घातल्यानंतर या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. मानाच्या गणपतींसह सर्वच गणेश मंडळांनी श्रींचे विसर्जन मंडपातच करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.पोलिसांनी प्रतिष्ठित गणपतींच्या विसर्जन सोहळा हा ऑनलाईन पाहावा असे आवाहन केले आहे. विसर्जन मिरवणुकीमुळे शहरात मोठया प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुण्याचा गणेशोत्सवाला जगभरात नावलौकिक प्राप्त झालेला आहे. इथला गणेश विसर्जन मिरवणुक नयनरम्य सोहळा तर अक्षरश:डोळ्यांचे पारणे फेडणाराच असतो. मंडळाच्या कार्यकर्त्यांची निरोपाची धावपळ,विसर्जन मिरवणूक रथाची आकर्षक सजावट,मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीने होणारे विसर्जन, ढोल ताशा, डीजे , लेझीम पथके,बँड असं सार काही वैशिष्ट्यपूर्णच. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण-उत्सवांवर बंधने आली. त्यामुळे गणेश सोहळा देखील त्याला अपवाद ठरला नाही. सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रशासनाने मर्यादा घालून दिल्या होत्या. आणि आश्चर्य म्हणजे सर्व मंडळांनी एकीकडे आपली परंपरा जपत दुसरीकडे समाजासमोर आदर्श ठेवताना प्रशासन व पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत तसेच नियमांचे कटाक्षाने पालन करत लाडक्या बाप्पांचा गणेशोत्सव निर्विघ्नंपणे पार पाडला. त्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याला प्रतिबंध झाला.
महापालिका प्रशासन व पोलीस यंत्रणांनी नागरिकांना घरीच मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. फिरत्या हौदात देखील विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना मूर्ती दान करण्याचा देखील एक पर्याय महापालिका प्रशासनाने नागरिकांसमोर ठेवला आहे.
'असा' असेल पुण्याच्या मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा
१) परंपरेप्रमाणे पुण्याचे महापौर सकाळी १०.३० वाजता श्री कसबा गणपतीला हार घालतील
२) सकाळी ११.३० वाजता पहिला मानाचा कसबा गणपतीचे विसर्जन होईल.
३) दुसरा मानाचा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी १२.१५ वाजता,
४) तिसरा मानाचा गुरुजी तालीमचा गणपती दुपारी १ वाजता,
५) चौथा मानाचा श्री तुळशीबाग गणपती दुपारी १.४५ वाजता,
६) पाचवा मानाचा केसरी वाडा गणपती दुपारी २.३० वाजता,
७) श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दुपारी ३.१५ वाजता,
८) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सूर्यास्ताच्या वेळी, ६:४७ वाजता
९) अखिल मंडई मंडळाचा गणपती सायंकाळी ७ वाजता विसर्जन होईल.