पुणे : शहरातील वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला दिमाखात सुरवात झाली आहे. दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. विसर्जन घाटावरील हौदांच्या रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे. विसर्जन घाटावर महापालिकेचे कर्मचारी, जीवरक्षक, सफाई कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ४२ हौद बांधले आहेत, एकूण २६५ ठिकाणी ५६८ लोखंडी टाक्यांची व्यवस्था गणेशमूर्ती विसर्जन करण्यात आली आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण २५२ ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे आणि गणेशमूर्ती दान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
शहरात अनेकांच्या घरात दीड दिवसाचे गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. या गणरायांना बुधवारी भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी संगम घाट, नेने/ आपटे घाट, वृद्धेश्वर घाट/ सिद्धेश्वर घाट, ओंकारेश्वर, अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ), पुलाची वाडी, नटराज सिनेमा
मागे, बापूघाट (नारायण पेठ), खंडोजी बाबा चौक, विठ्ठल मंदिर (अलका चौक), गरवारे कॉलेजची मागील बाजू, ठोसरपागा घाट १५. दत्तवाडी घाट, राजाराम पूल घाट, सिद्धेश्वर मंदिर, औंधगाव घाट, चिमा उद्यान येरवडा, बंडगार्डन घाट, वारजे कर्वेनगर, गल्ली क्र. १ नदीकिनार, पांचाळेश्वर घाट या घाटांवर सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गणेशमूर्तीचे विसर्जन करताना लहान मुलांना नदी, कॅनॉल, विहिरी, तळे यांपासून दूर उभे करून त्यांच्याजवळ जबाबदार व्यक्तीने थांबावे. पालिकेच्या वतीने नदीकाठी नेमण्यात आलेल्या जीवरक्षक सेवकांकडून शक्यतो गणेशमूर्तीचे विसर्जन करवून घ्यावे. एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याची कल्पना नदीकाठी नेमलेल्या जीवरक्षकांना तातडीने द्यावी. प्रत्येक प्रभागात गणपती विसर्जनासाठी फिरत्या हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे.