लोणी काळभोर : शितपेय व एनर्जी ड्रींकचे माल साठवणुक करण्याच्या गोडाऊनचा पत्रा उचकटून अज्ञात चोरटयाने २ लाख ६७ हजार ६४४ रुपये किंमतीचे २८७ एनर्जी ड्रींकचे बॉक्स चोरून नेल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी वैभव सतीश खंडेलवाल ( वय ३८, रा. लोणी काळभोर ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडेलवाल हे देवांश ट्रेडर्स या फर्म मार्फत शितपेय व एनर्जी ड्रींक्स विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे गोडाऊन कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाडवस्ती येथे आहे. २७ सप्टेंबरला रात्री १० च्या सुमारांस मुंबई येथून आलेला कन्टेनर गोडावून मध्ये खाली करुन घेतला होता. १ ऑक्टोबर रोजी दिवसभर विक्री करून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारांस शटरला कुलूप लावून ते घरी गेले. २ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता गोडाऊन उघडण्यासाठी गेले.
त्यावेळी त्यांना गोडाऊनच्या शटरचा दरवाजा उचकटून कूलूप तोडलेले दिसले. त्यावरुन गोडाऊन मध्ये चोरी झालेचा संशय आल्याने आत जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांना २ लाख ४९ हजार ६४४ रुपये किंमतीचे हेल्ल एनर्जी ड्रींकचे २७८ बॉक्स व १८ हजार रुपये किंमतीचे रेडबुल एनर्जी ड्रींकचे एकूण ९ बॉक्स असे एकूण २ लाख ६७ हजार ६४४ रुपयांचे एकूण २८७ बॉक्स लंपास झाल्याचे कळताच त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल केला आहे.