पुणे : राज्यभरात खळबळ माजविणा-या तसेच मुंबई, ठाणे, डोंबिवलीपाठोपाठ गुडविन ज्वेलर्सने पुण्यातील गुंतवणूकदारांनाही ३ कोटी ४ लाख रुपयांनागंडा घातल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुडवीन ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सुनीलकुमार अकाकरण मोहनन, संचालक सुधीरकुमार अकाकरण मोहनन, शाखा व्यवस्थापक जस्टीन, सेल्समनअश्वीन, चंद्रिका, श्रीकला नायर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आतापर्यंत ८९ जणांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी आशा गायकवाड (वय ४५, रा. येरवडा) यांनी कोरेगाव पार्कपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गुडवीन ज्वेलर्सचे बंडगार्डन रोडवरील मोबाज चौकातील कॅनोट प्लेस या इमारतीत शोरुम होते. गेल्या काही दिवसांपासून ते बंद आहे. गुडविन ज्वेलर्सचा मालक व व्यवस्थापकीय संचालक सुनीलकुमार अकाकरण मोहनन, संचालक सुधीर अकाकरण, शाखा व्यवस्थापक जस्टीन, सेल्समन अश्विन, चंद्रिका, श्रीकला नायर यांच्यासह अन्य व्यक्तींनी संबंधित सराफी दुकानामधील भिशी व गुंतवणूक योजनेनुसार, पैसे गुंतविल्यास अधिक नफा मिळेल किंवा सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखविले, त्यानुसार गायकवाड व इतरांनी २०१८ मध्ये त्यांच्याकडे पैसे गुंतविले़ गायकवाड यांनी गुडवीन ज्वेलर्सकडे ३ लाख रुपये गुंतविले होते. परंतु त्यांची फसवणूक करण्यात आली. गायकवाड यांच्या प्रमाणे आणखी ८८ जणांनी गुडवीन ज्वेलर्सकडे पैसे गुंतविले होते. या ८८ जणांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांकडे ३ कोटी ४ लाख ४३ हजार ८८० रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. गुडविन ज्वेलर्स २३ ऑक्टोबरपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. अनेक दिवस गुंतवणूकदारांनी ज्वेलर्स दुकानाचा पाठपुरावा केला, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिले. त्यानुसार गुडविन ज्वेलर्सवर एमपीआयडी अॅक्टनुसार देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुडविन ज्वेलर्सचा पुणेकरांना ३ कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 10:33 PM