पुणे :बिबवेवाडीत दहशत माजविणारा गुंड अनिकेत कोंढरे याच्यासह साथीदारांविरोधात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
अनिकेत ऊर्फ अंड्या विजय कोंढरे (वय २२), रितेश विजय कोंढरे (वय २४, दोघेही रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी), अंकित ऊर्फ अभिषेक सोमा (वय २४, रा. श्रीनाथ टेरेस, साईनगर, कोंढवा), विशाल लक्ष्मण रेणुसे (वय २२, रा. काशिनाथ पाटीलनगर, बालाजीनगर, धनकवडी) यांच्यावर मोक्का कारवाई केली आहे.
पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ११ गुंड टोळ्यांवर कारवाई केली. अनिकेत कोंढरे आणि साथीदारांनी बिबवेवाडी, इंदिरानगर भागात गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. लूट, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल झाले आहेत.