पुणे : सेवानिवृत्त कृषी अधिकऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात पोलिसांनी ४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. त्याच्याकडून ५ तोळ्याची सोनसाखळी, २ कार आणि २ दुचाकी असा ६ लाख २६ हजारांचा माल जप्त केला आहे.
सोरनसिंग कतारसिंग टाक (वय २०, रा. जय तुळजा भवानी वसाहत, हडपसर) याच्यासह एका विधी संघर्षीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी सेवानिवृत्त कृषी अधिकारी किशोर देशमुख (वय ५९, रा. सातववाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. देशमुख हे १६ मार्च रोजी सायंकाळी हडपसरमधील ग्लायडिंग सेंटर येथे फिरायला गेले होते. चालून झाल्यावर ते एका झाडाखाली बसले असताना चौघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील २ सोनसाखळ्या चोरुन नेल्या होत्या.
गुन्हे शाखेच्या युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करताना पोलीस अंमलदार विनोद शिवले, विलास खंदारे यांना हा गुन्हा टाक व त्याच्या साथीदारांनी केल्याचे समजले. तो फुरसुंगी येथे सोनसाखळी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली़ त्याच्याकडे केलेल्या तपासात हडपसर, चिंचवड, कोरेगाव पार्क आणि कोंढवा पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.