पुणे/किरण शिंदे: मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यात मागील दीड वर्षापासून फरार असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी अखेर जेरबंद केले. वृषभ रामदास शेवाळे (वय 24) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. उरुळी देवाची परिसरात असणाऱ्या शेवाळे टोळीचा तो टोळीप्रमुख आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शेवाळे टोळीने उरुळी कांचन परिसरात 2021 मध्ये दहशत माजवली होती. या टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तत्कालीन पोलीस आयुक्तांनी संपूर्ण टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली होती. पोलिसांच्या या कारवाईनंतर तो फरार झाला होता.
दरम्यान कोंढवा पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी त्याचा शोध घेत होते. दरम्यान त्याचा शोध सुरू असतानाच पोलीस हवालदार निलेश देसाई आणि पोलीस नाईक ज्योतिबा पवार यांना तो अहमदनगर जिल्ह्यातील चांदा या गावी राहत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार कोंडवा पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील यांच्यासह कर्मचारी निलेश देसाई, सतीश चव्हाण, गोरखनाथ चिंके आणि ज्योतिबा पवार यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास चांदा गावात जाऊन रात्रीच्या वेळीस गाढ झोपेत असताना त्याला अटक केली.