धनकवडी : बालाजीनगर परिसरात दहशत निर्माण करून त्याचे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करणाऱ्या गुंडांची बालाजीनगर परिसरातून वरात काढली, सर्व सामान्य नागरिकांच्या मनातून या गुंडांची दहशत कमी व्हावी हा या मागचा उद्देश होता. मात्र पोलिसांनी हा आमच्या तपासाचा भाग असून गुन्हा केलेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी त्यांना नेल्याचे स्पष्ट केले.
मागील आठवड्याभरात समाज माध्यमावर गुन्हेगाराच्या दहशतीचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. सदर व्हिडीओ बालाजीनगर परिसरातील असल्याचे समोर आले. यामध्ये एका अल्पवयीन मुलास मारहाण करून त्याला पाया पडायला लावले तर एका महिलेला शिवीगाळ केल्याचे दिसत होते. तसेच दुसऱ्या व्हिडीओमध्ये हातात कोयता घेऊन दुचाकीवरून येणाऱ्यांना अडवून दहशत निर्माण करत असल्याचे दिसत होते. माध्यमां नी हा विषय लावून धरल्यावर पोलिस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले. यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण मांडून बसले आणि गुन्हेगारांची झाडाझडती घेतली.
सहकारनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर गुन्हे शाखेच्या पथकाने सलमान शेख या गुंडाला अटक केली. या गुंडांना बालाजीनगर परिसरात जेथे दहशत माजवली होती तेथे तपासासाठी नेण्यात आले.
यावेळी त्यांना बघण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलीस खाक्या दाखविल्यानंतर गुन्हेगारांची गुर्मी जिरली असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. एक प्रकारे त्यांची परिसरातील दहशत संपविण्यासाठीच पोलिसांनी अशा प्रकारे त्यांची वरात काढल्याचे स्थानिक नागरिक बोलत होते. मात्र पोलीसांनी हा तपासाचा भाग असल्याचे सांगितले.