गोपीचंद पडळकर तालुक्याचे नेते नसून त्यांचा संपूर्ण राज्यात प्रवास - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 01:54 PM2022-01-24T13:54:29+5:302022-01-24T13:59:41+5:30
'गोपीचंद पडळकर हे एका तालुक्याचे नेते नाहीत...'
पुणे: आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील (rohit patil) यांच्यामुळे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. तर दुसरीकडे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि अजित पवार (ajit pawar) यांच्यावर टीका करून लक्ष वेधून घेणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांच्या गावच्या निवडणुकीकडेही अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र पडळकर यांच्या खानापूर नगरपंचायतीवर भाजपला भोपळाही फोडता आला नाही. मात्र असं असलं तरीही भाजपा पडळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं स्पष्ट आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात भाजपचा पराभव झाल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, गोपीचंद पडळकर हे एका तालुक्याचे नेते नाही. संपूर्ण राज्यभर त्यांचा प्रवास सुरु आहे. पडळकर यांच्या खानापूर आटपाडी मध्ये निवडणुका लागू द्या, मग बघूया, तो त्यांचा खरा बालेकिल्ला आहे. खानापूर-आटपाडी मिळून तो मतदार संघ तयार होतो. पंढरपूर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवून दिला. अनेक दिवस ते या मतदारसंघात ठाण मांडून बसले होते, अशी चंद्रकांत पाटील यांनी पडळकर यांची पाठराखण केली.
गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात झालेल्या खानापूर नगरपंचायतीत शिवसेना काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. मात्र याठिकाणी भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे ज्या नगरपंचायतची जबाबदारी गोपीचंद पडळकर यांच्या खांद्यावर भाजपने दिली होती, तिथे पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधकांनी पडळकर यांच्यावर टीका केली होती.