इंदापूर (पुणे) : राजकीय कारणातून छगन भुजबळ या व्यक्तीविषयी राग असू शकतो, मात्र सर्व ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी तरी सर्व राजकीय पक्षांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात बोलताना शनिवारी ( दि.९) केले. या मेळाव्याला आमदार गोपीचंद पडळकरही आले होते. हा मेळावा आटोपून परत जाताना आ. गोपीचंद पडळकर यांनी प्रशासकीय भवनाच्या भिंतीजवळ सुरु असणाऱ्या दीपक काटे यांच्या दुधदराविषयी सुरु असणाऱ्या उपोषण आंदोलनास भेट दिली. त्या वेळी काटे यांच्या शेजारी सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांनी गो बॅक च्या घोषणा दिल्या. त्यांच्या दिशेने चप्पल व बुट भिरकावल्याची घटना घडली.
आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात ओबीसींचे आरक्षण टिकवण्याची निकड सविस्तरपणे मांडताना भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. महसूल व पोलीस प्रशासनाला निर्वाणीचे इशारे ही दिले. ते म्हणाले की,आमचा मराठा समाजाला नव्हे तर सुरु असलेल्या झुंडशाहीला विरोध आहे. आरक्षण देणे म्हणजे 'गरीबी हटाव'चा कार्यक्रम नाही. दलित समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळे नोक-या मिळाल्या. परंतू गरीबी हटली नाही. जो वर्ग खरोखरच उपेक्षित राहिला आहे, त्याला प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आहे.ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या उपेक्षितांना आरक्षण द्यावे. त्यांना जे दिले तेच ओबीसी समाजाला द्यावे. गेल्या दोन महिन्यात दिलेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष,निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे हे जे काम करत आहेत,ते थांबवा. जनगणना करा. ओबीसींचा अनुशेष भरुन काढा अश्या आमच्या मागण्या आहेत, असे ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील रात्री अपरात्री सभा घेतात. आपण पंधरा दिवसात एखादी सभा घेतो. मात्र राज्यात अशांतता निर्माण करण्याचा आरोप केला जातो. जरांगे पाटील यांच्या सभांना परवानगी कोण देतो. त्यांच्यावर कारवाई का होत नाही. कुणबी दाखला एका दिवसात मिळतो. इतरांना दाखले मिळण्यासाठी दोन तीन महिन्यांचा कालावधी का लागतो असे सवाल भुजबळ यांनी उपस्थित केले. जरांगे यांनी आक्षेपार्ह बोलणे थांबवावे. सर्वांच्या संयमाला मर्यादा असतात.जर तो संपला तर त्याला कोणी ही आवरु शकत नाही. दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल असा इशारा देत, महाराष्ट्रातील प्रशासन देशात अव्वल मानले असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलीस यंत्रणेतील घटकांनी अशा बाबींकडे त्रयस्थपणे पहावे. वेळेत उपाय करावा अन्यथा काबूत येणार नाही अशी अशांतता माजेल असा इशारा भुजबळ यांनी दिला.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, प्रा. टी. पी. मुंडे, दौलतराव शितोळे, कल्याणराव दळे, राजाराम पाटील, शब्बीर अन्सारी, लक्ष्मणराव गायकवाड, लक्ष्मण हाके, पांडुरंग शिंदे, तानाजी धोत्रे यांची भाषणे झाली.