पुणे : विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कापून भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अनिल शिरोळे यांचे तिकीट कापले जाण्याची ही पहिली वेळ नाही़. यापूवीर्ही त्यांचे तिकीट ऐनवेळी कापण्यात आले होते. पुणे महापालिकेच्या २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अनिल शिरोळे यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी अनिल शिरोळे यांचे नाही तर माझेच तिकीट कापले, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला होता.
गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा संच पुणे शहरात कार्यरत होता. त्याचे नेतृत्व अनिल शिरोळे हे करीत असत. पुणे महापालिकेच्या २००७ मधील निवडणुकीच्या वेळी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यात राजकीय शितयुद्ध सुरु होते. त्यातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत अनिल शिरोळे यांना तुम्हाला तिकीट देणार हे सांगितले. त्यामुळे ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असताना ऐनवेळी त्यांना तुम्हाला तिकीट देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याऐवजी विकास मटकरी यांना तिकीट देण्यात आले होते.
ही बाब शहरातील मुंडे समर्थकांना समजल्यानंतर त्यांनी भाजपच्या त्यावेळच्या जोगेश्वरी मंदिराशेजारी कार्यालयात जाऊन एकच गोंधळ घातला होता. त्यानंतर मुंडे समर्थक कार्यकर्ते मुंबईला जाऊन गोपीनाथ मुंडे यांना भेटले होते. त्यावेळी मुंडे यांनी अनिल शिरोळे यांचे नाही तर माझेच तिकीट कापले अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या ऐवजी विकास मठकरी यांना तिकीट देण्यात आले होते. त्यानंतर शहराध्यक्ष पदासाठी झालेल्या पक्षांतर्गत मतदानात मुंडे गटाचे योगेश गोगावले यांना सर्वाधिक पसंती दर्शविण्यात आली होती. असे असतानाही विकास मठकरी यांना शहराध्यक्ष करण्यात आले. त्यावेळीही मुंडे समर्थकांना डावलण्यात आल्याने पक्षातील संदोपसंदी समोर आली होती. आपली सर्वत्र कोंडी केली जात असल्याचे दिसल्यावर गोपीनाथ मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींना थेट पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी मुंडे यांची समजूत घातल्यानंतर मुंडे यांचे बंड थंड झाले. त्यावेळी तडजोड होऊन अनिल शिरोळे यांना शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. २०१४ मध्ये पुन्हा एकदा अनिल शिरोळे की बापट असा चुरस झाली होती. मात्र, त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी आपला आग्रह शेवटपर्यंत कायम ठेवल्याने अनिल शिरोळे यांना तिकीट देण्यात आले होते. यावेळी नाराज झालेले गिरीश बापट हे सुरुवातीला प्रचारात सहभागी झाले नव्हते.
गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा गट पुणे शहरात होता. मात्र, मुंडे यांच्या अचानक जाण्याने गेल्या तीन साडेतीन वर्षात हा गट विस्कळीत झाला. अनेकांनी काळाची पावले ओळखून जुळवून घेतले व वेगवेगळी पदे पदरात पाडून घेतली. अनिल शिरोळे यांना खासदारकी मिळाली, तरी गेल्या ५ वर्षात त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या या शांत स्वभावाचा फायदा इतरांनी उचलला. त्यामुळे मुंडे यांचे कट्टर समर्थकही दुरावले गेले. महापालिका निवडणुकीत त्यांनी या कार्यकर्त्यांसाठी आपले वजन न वापरल्याने अनेक कार्यकर्ते बाजूला गेले. २०१४ मध्ये ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे यांनी अनिल शिरोळे यांच्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे आग्रह धरला होता, असा आग्रह धरणारे आता कोणी नसल्याने तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी ज्या पद्धतीने सर्व पक्ष आपल्या बाजूने वळविला, त्यामुळे दिल्लीतही शिरोळे यांची बाजू कमी पडल्याने त्यांना दुसऱ्यांदा तिकीट कापल्याचे पहाण्याची वेळ आली.