होळी सणानिमित्त गोवऱ्या, ढोलकी, रंगाची पाकिटे घेऊन रस्तोरस्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मात्र, खरेदीदार फिरत नाही, अशी व्यथा सोलापूर रस्त्यावरील हडपसरमधील विक्रेत्यांनी मांडली.
कोरोनाचे वाढते सावट असूनही होळी सणासाठी गोवऱ्या, ढोलकी, रंगाची पाकिटे घेऊन विक्रेत्यांनी रस्तोरस्ती दुकाने थाटली आहेत, तर काहींनी हातगाडीवर विक्रीसाठी भ्रमंती सुरू केली आहे. मात्र, कोरोनामुळे शासनानेच होळी सणावर निर्बंध घातल्याने खरेदीदारांनी पाठ फिरविली आहे.
दिवाळीनंतर कोरोनातून सावरण्यासारखी परिस्थिती झाली होती. त्यामुळे आम्ही रोजगारासाठी पुन्हा शहराकडे आलो. त्यातच आठवड्यातून एक-दोन दिवस रोजगार मिळतो, त्यामध्ये संसाराचा गाडा हाकतो. मात्र, मागील महिन्यापासून पुन्हा कोरोनाने उसळी घेतली आहे, त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होते की, काय अशी चिंता वाटू लागली आहे. आता पुन्हा गावाकडे जायचे तर पैसे नाही, खायचे काय, मुलाबाळांना सांभाळायचे कसे अशी विचारणी राज्य-परराज्यातून मजूर अड्ड्यावर आलेली मंडळी एकमेकांना विचारताना दिसत आहेत.
हडपसर गांधी चौकातील मजूर अड्ड्यावरील कामगारांची संख्याही दिवसेंदिवस घटू लागली आहे. हाताला काम नाही, त्यामुळे यावर्षी मुलाबाळांना होळी सणासाठी नवी कपडे कशी घ्यायची. कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन झाले. तर काय करायचे अशी मोठी चिंता वाटू लागली आहे. मागिल चार-सहा महिन्यांपासून आठवड्यातून एक-दोन दिवस मजुरी मिळते, त्यामध्ये कसाबसा संसार चालवतो. पुन्हा लॉकडाऊन केले, तर काय करायचे, शासन म्हणते घरात बसा. आम्हालाही घरामध्ये बसायला आवडेल. दिवसभर काम केल्यानंतर पोटासाठी धान्य करायचे आणि खायचे अशी परिस्थिती आमची आहे. घरामध्ये बसून काय खायचे, असा सवालही येथील अनेक लोकांनी उपस्थित केला.