पुणे : जगातली प्रत्येक गोष्ट नष्ट होते. पण काही हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली जातीप्रथा का नष्ट होत नाही? जातीप्रथेने आजपर्यंत समाजाचे अतोनात नुकसान तर झालेच, पण कायम देशाच्या लोकशाही प्रणाली आणि सर्वधर्मसमभाव तत्वाला प्रचंड धोका निर्माण केला आहे. त्यात सध्याचे सरकार हे सांप्रदायिकतेला खतपाणी घालण्याचे काम करत आहे, असा आरोप लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार यांनी केला आहे. ‘ये मेरे दिल की बात हैं’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.डॉ. विकास आबनावे लिखित ‘स्वातंत्र्यसेनानी ते उपपंतप्रधान’ या बाबू जगजीवनराम यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मीराकुमार यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे झाले. या वेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, आदी उपस्थित होते.मीराकुमार म्हणाल्या, धर्म नेमका काय कार्य करतो, हा सातत्याने मनाला भिडणारा प्रश्न आहे. माणसाच्या आतील मानवतेला देवत्व प्राप्त करुन देतो की, शत्रुत्व निर्माण करण्याचे काम करतो. गेल्या काही वर्षात समाजात वाढणारी सांप्रदायिकता व त्यातून उत्पन्न होणारी अराजकता हा चिंतेचा विषय आहे. समाजातील काही घटकांना आजही कित्येक ठिकाणी मंदिर प्रवेशास बंदी आहे. कुठलेही सरकार असो ते ज्या काही योजना महिला, दलित, अल्पसंख्यांक किंवा इतर दुर्लक्षित घटकांसाठी राबविते, हा त्यांच्यावर केलेला उपकार आहे, अशा आविर्भावात असते. परंतु हा उपकार नाही सरकारचे ते आद्य कर्तव्य आहे. स्वातंत्र्यासाठी या लोकांनी सर्वस्व अर्पण केले आहे.केंद्र व राज्य सरकारबद्दल जनतेच्या मनात असलेल्या असंतोषामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत काँगे्रसचा विजय होईल, असे मीराकुमार यांनी सांगितले. पुणे श्रमिक पत्रकार संघात ‘माध्यमांचे स्वातंत्र्य’ या विषयावर त्या बोलत होत्या. माध्यमांना विरोध करणे म्हणजे एक प्रकारे लोकशाहीलाच विरोध केल्यासारखे आहे. सोशल मीडियाचा आधार घेऊन विजय झालेल्या भाजपच्या विरोधात आता सोशल मिडीयावर मोहीम सुरु झाली आहे. याचा परिणाम आगामी गुजरात निवडणुकीत दिसेल, असेही त्या म्हणाल्या.
सरकारकडून सांप्रदायिकतेला खतपाणी - मीराकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 3:16 AM