बारामती शहरात यापूर्वीच शासकीय महाविद्यालय सुरु झालें आहे. यंदा या महाविद्यालयात तिसरी बॅच प्रवेश घेणार आहे. या महाविद्यालयाला जोडून पाचशे बेडचे सर्वोपचार रुग्णालय सुरु होत आहे. सध्या हे रुग्णालय पूर्णतेच्या मार्गावर आहे. त्यापाठोपाठ आता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय शहरालगतच्या मेडद भागात होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अॅलिओपॅथीबरोबरच आयुर्वेदिक उपचारदेखील उपलब्ध होणार आहेत.
आयुर्वेदिक महाविद्यालयासह या ठिकाणी १०० बेडचे आयुर्वेदिक रुग्णालय देखील या ठिकाणी होणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या आयुष मंत्रालयाने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना देखील पत्र पाठवले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मेडद गट क्रमांक ४१४ येथील ५.८७ हेक्टर जागा प्रस्तावित केली आहे. त्यामुळे लवकरच बारामतीत आयुर्वेदिक महाविद्यालय उभा राहण्याचे संकेत आहेत.
विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मतदान झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचंड प्रभावित झाले आहेत. त्यातच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बारामतीकरांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. आज मंजुरीच्या वाटेवर असलेले आयुर्वेद महाविद्यालय त्याचाच एक भाग आहे. बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृषी, अभियांत्रिकी, औषधशास्त्र जैवशास्त्र, हवाई शिक्षणापाठोपाठ आता आयुर्वेदिक महाविद्यालय उभा राहत आहे. यानंतर राज्यात आता बारामती शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण शहर म्हणून उदयास येत आहे.