लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुळे पती गमावलेल्या निराधार महिलांना सरकार नक्की मदत करेल. त्यांच्याकरता योजना तयार करण्याचे आश्वासन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांंनी महिलांसाठी कार्यरत संस्थांच्या संयुक्त समितीला दिले.
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनीही या महिलांना मदत व्हावी यासाठी सरकारकडे मागणी करण्याचे जाहीर आवाहन केले होते. राज्याच्या २५ जिल्ह्यातील २०५ संस्थांंनी याला प्रतिसाद देत सरकारला मदतीची मागणी करणारे ई-मेल केले आहेत. यासाठी कोरोना बाधित कुटूंब पुनर्वसन समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीच्या वतीने स्वाधार महिला पंचायतचे नितीन पवार यांनी गुरुवारी मुंबईत मंत्री ठाकूर यांची भेट घेत त्यांना याविषयीचे निवेदन दिले. राज्यात अशा महिलांची संख्या २० हजार आहे. त्यांचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, जगण्याचा खर्च, नावावर असणाऱ्या मालमत्तेवरून नातेवाईकांमध्ये होणारे वाद असे असंख्य प्रश्न या निराधार महिलांच्या बाबतीत आहे. त्यांना सरकारी मदतीची नितांत गरज असल्याचे पवारांनी ठाकूर यांना सांगितले.
मंत्री ठाकूर यांनी त्यांना महिला बालकल्याण विभागही अशी माहिती जमा करत असल्याचे सांगितले. सरकार या महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे, मात्र फक्त अर्थसाह्य करून चालणार नाही, तर कायमस्वरूपी योजना हवी, अशी योजना अभ्यासपूर्वक तयार करू व राबवू असे आश्वासन ठाकूर यांनी दिले.