लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “माझा दौरा हवाई नव्हे जमिनीवरून आहे,” असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्या गुजरातच्या हवाई दौऱ्यावर भाष्य केले होते. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांचा नामोल्लख न करता प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले, “तुमचे पाय हे तुमचे सरकार आल्यापासूनच हवेत गेले आहेत. ते जमिनीवर राहण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि यातच आनंद आहे.”
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नुकताच कोकणाचा दौरा केला. याविषयी पाटील म्हणाले की ते दोघेही विधिमंडळातील विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर आढावा घेण्यासाठी त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गचा दौरा केला. दोघांनी ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या कोळी बांधवांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांचे सांत्वन केले.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कधी नव्हेत ते बाहेर पडले. दीड वर्षांनी बाहेर पडल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांना उपदेश करण्याचे कारण नाही,” असे पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले की, फडणवीस आणि दरेकर यांनी हवाई प्रवास केलेला नाही. पंतप्रधानपद हे एक असे पद आहे की ज्याबाबत धोका पत्करला जात नाही. त्यामुळे सुरक्षितता राखून पाहणी करायची तर हवाई मार्ग हीच परंपरा आहे.
चौकट
...म्हणून मोदी गोव्याला गेले
पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा करीत आर्थिक पॅकेज जाहीर करून महाराष्ट्राबाबत दुजाभाव केल्याची टीका केली जाते. याविषयी पाटील म्हणाले, “सर्वार्थाने या वावड्या आहेत. अनावश्यक चर्चा आहे. हवाई प्रवास करताना हवामान खात्याने महाराष्ट्राच्या सागरी पट्ट्यात येणे सोयीचे नसल्याची सूचना केली होती. त्यामुळे ते महाराष्ट्रात आले नाहीत. केंद्राकडून येणारी मदत चक्रीवादळ आलेल्या प्रत्येक राज्यासाठी असेल. ती फक्त गुजरातसाठी नाही. शिवाय महाराष्ट्र आणि गोव्याला त्यांनी पंचनामे करुन. नुकसानीचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर या दोन्ही राज्यांना केंद्राकडून आणखी मदत मिळेल.” -चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप