पुणे : दुष्काळात मंत्र्यांचे अनेक दौरे झाले मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलं नसल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केली. साखर आयुक्त कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी दुष्काळाच्या मुद्दयावर सरकारने केलेल्या कामाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मंत्री जात असताना अनेकदा आधीच बंदोबस्त केला जातो. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतले जाते. मंत्र्यांचे पोलीस बंदोबस्तात दौरे सुरु आहेत त्यावरून लोकांच्या मनात किती मोठा उद्रेक आहे हे लक्षात येत आहे. असा स्थितीत आचारसंहितेचा बाऊ करून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
सक्तीची बँक वसुली, विद्यार्थ्यांची फी मोफत करणे या केवळ शाब्दिक घोषणा ठरल्या आहेत. चारा छावण्यांमध्येही शेतकऱ्यांचे हाल सुरु असून त्या छळ छावण्या आहेत की काय वेळ निर्माण झाली आहे. अशा परिथितीत सरकार काय करत आहे. काय अंमलबजावणी करायची हे सर्वांना माहिती आहे. मात्र केवळ कर्तव्य टाळण्यासाठी आचारसंहितेचा बाऊ केला जात आहे.
पुढे त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- ८० टक्के कारखान्यांनी एफ आर पीची रक्कम अदा केली आहे. इतर कारखान्यांविषयी साखर आयुक्तांशी चर्चा.
- साखर आयुक्तांनी स्पष्ट आदेश देऊनही कारखानदारांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर खटले दाखल करणार
- शेतकऱ्यांना लवकरात लवकर एफ आर पी मिळावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न