पुणे : १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला सुनावले. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी १२ सदस्यांच्या नियुक्तीविषयी राज्यपालांना विचारणा केली असता कोश्यारी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर भगतसिंह कोश्यारी आणि त्यांच्यापाठोपाठ अजित पवार उपस्थित मान्यवरांच्या भेटीगाठी घेत असताना अचानक समोरून काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी राज्यपालांना १२ सदस्यांच्या नियुक्तीविषयी विचारणा केली.या प्रश्नाची अपेक्षा कदाचित राज्यपालांनीदेखील केली नव्हती. मात्र, शरद रणपिसे यांच्या प्रश्नावर राज्यपालांनीही तत्काळ उत्तर देत वेळ मारून नेली. या वेळी आपल्या मागेच उभ्या असलेल्या अजित पवार यांच्याकडे हात दाखवून राज्यपाल म्हणाले, हे माझे मित्र आहेत. सरकार आग्रह धरत नाही, तर तुम्ही का धरता? राज्यपालांच्या या उत्तरावर अजित पवार यांनीही खाेचक हास्य केले.अजित पवारांनी विषय टाळलादरम्यान, राज्यपालांनी दिलेल्या उत्तरावर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही विचारणा केली. त्यावर बोलताना, आज स्वातंत्र्य दिन आहे. या विषयावर नंतर बोलेन, एवढेच बोलून अजित पवारांनी विषय टाळला.
१२ सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह सरकारकडून नाही, राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 6:03 AM