पुणे : गेल्या वर्षभरापासून भूसंपदानाअभावी रखडलेल्या चांदणी चौक उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने पुणे पालिकेला तब्बल १८५ कोटी रुपयांचा निधी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मान्यता दिली. आमदार मेधा कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
चांदणी चौक येथे बहुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या उड्डाणपुलाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी निधीची तरतूदही केली आहे. मागील वर्षी आॅगस्ट २०१७ मध्ये उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. मात्र आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने या पुलाचे काम भूमिपूजनानंतर एक वर्ष झाले सुरू होऊ शकलेले नाही. किमान ८० टक्के जागा ताब्यात असल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही, अशी भूमिका महामार्ग प्राधिकरणाने घेतली होती. पुणे पालिकेने भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत असमर्थता दाखवल्याने राज्य शासनाने यासाठी मदत करावी, असा प्रयत्न पालिका व लोकप्रतिनिधींनी केला. मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, परंतु नगरविकास खात्याने एकूण मागणीच्या ५० टक्केच निधी द्यावा, असा प्रस्ताव दिला. यामुळे पुन्हा महापालिकेची अडचण निर्माण झाली. परंतु पालिकेला शंभर टक्के निधी द्यावा, अशी मागणी केली.