पुणे- कोंढवा परिसरात रात्री 1.30 च्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. बिल्डर आणि महापालिकेतील दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर या दुर्घटनेनंतर टीका केली आहे.
कोंढवा दुर्घटनेने बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे समोर आले. बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का? हे कामगार असंघटित क्षेत्रातील आहेत म्हणून त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे तसेच पुणे महापालिकेने देखील ही घटना गांभिर्याने घ्यावी अशी मागणी केली आहे.
सुप्रिया सुळेंनी यापुढे म्हटलं आहे की, नगरविकास खात्यानेही बांधकाम व्यावसायिक कामगार पुरविणारे ठेकेदार यांच्यावर असणारी कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षितता पुरविण्याची जबाबदारी निश्चित करावी.त्याची कठोर अंमलबजावणी होतेय की नाही हे सरकारने पहावे. कोंढवा दुर्घटनेप्रकरणी दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केली आहे.
तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चव्हाण यांनी म्हटलंय की, पुण्याच्या कोंढवा परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आहे. मृतांच्या व जखमींच्या कुटुंबीयांना सरकारने मदत करावी व या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुर्घटनेतील जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना योग्य ती मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.