"राज्यातील जातीय संघर्षाला सरकारच जबाबदार" काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका
By राजू इनामदार | Published: June 22, 2024 05:08 PM2024-06-22T17:08:04+5:302024-06-22T17:08:41+5:30
पुणे शहर लोकसभा मतदार संघातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले होते....
पुणे : राज्यातील जातीय संघर्ष राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झाला. शाळेतील मुलेही आता ओबीसी मराठा करतात. ते पाहून या सरकारचा निषेध करावा वाटतो अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पुणे शहर लोकसभा मतदार संघातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पटोले शनिवारी पुण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला. केंद्र व राज्य सरकारवर त्यांनी टीका केली. जातनिहाय जनगणना करा अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारला काही करायचेच नाही. २०१४ पासून भाजपने राज्यात हे सगळे सुरू केले. नाशिक मध्ये शुक्रवारी काही पत्रके वाटण्यात आली. हे सगळे संताप आणणारे आहे शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही हे चालू देणार नाही असे पटोले म्हणाले.
राज्यात ३५० ओबीसी जाती आहेत. पण सरकार काही ठराविक लोकांनाच भेटत आहे. भाजपचे अध्यक्ष सांगतात ५० टक्केपक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही,तर देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही देऊ. नेमके काय आहे? राहूल गांधी पंतप्रधान झाले असते तर आम्ही सर्वप्रथम जाती निहाय जनगणना सुरू केली असती. त्यातून हा प्रश्न सुटायला मदत झाली असती असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड भाजप मध्ये गेले आणि स्वच्छ झाले,आपण शुद्ध आहे अस दाखवण्याचा प्रयत्न केला, पूजा चव्हाण प्रकरणातील लॅब रिपोर्ट आलेच नाहीत सरकार ते लपवत आहे असा आरोप पटोले यांनी केला. महायुतीत महाभारत सुरू आहे. मला त्यावर बोलायचे नाही. विधानसभा आम्ही एकत्रच लढू. जागा वाटप सगळे एकत्र बसलो की होईल. आघाडीतील मोठा भाऊ वगैरे काही नाही. भाजप विरोधात आहेत, त्यांना सोबत घ्यायची आमची भूमिका आहे. जागा कमीजास्त मिळतील, पण सरकार बदलायचे हा आमचा निर्धार आहे असे पटोले म्हणाले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पटोलेंचे स्वागत केले.