पुणे: शहरातील वाहतुकीच्या खेळखंडोब्याला सरकारच जबाबदार आहे. शहरांतर्गत प्रवासासाठी पुणेकरांचा श्वास असलेल्या पीएमपीएलच्या (PMPML) व्यवस्थापकपदाच्या सातत्याने बदल्या करून सरकार सार्वजनिक सेवेबाबत आपण गंभीर नाही हेच दाखवून देत असल्याची टीका काँग्रेसने केली. प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच पत्र लिहिले आहे.
एकाही व्यवस्थापकीय संचालकाला सरकार कार्यकाल पूर्ण करू देत नाही. शहरातील सार्वजनिक प्रवासी सेवेसाठी एकमेव असलेल्या या कंपनीचे कामकाज कार्यक्षम व्हावे, असे सरकारला वाटतच नाही. खंबीर, कणखर व्यवस्थापकीय संचालक असेल, त्याला पूर्ण कार्यकाळ मिळेल तर तो काहीतरी करेल. मात्र, सरकार कायमच या पदावरील नियुक्तीबाबत धरसोडपणा करत आहे, असे जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.
पीएमपीच्या ताफ्यात २ हजार बसगाड्यांची भर घातली जाईल, असे पालकमंत्री अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केले. मात्र, त्या दृष्टीने काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही. अनेक बस मार्गांवर प्रवाशांना बसची वाट पाहात तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. बसशेड्सही अपुऱ्या आहेत. शहराची वस्ती वाढली त्या कारणाने मार्गांची फेररचना करायला हवी आणि त्यासाठी सक्षम प्रमुख अधिकारी प्रदीर्घ काळ तिथे असायला हवा. मात्र, त्याकडे लक्ष देण्याऐवजी महायुती सरकार बेजबाबदारपणे वागून पीएमपीच्या कारभाराचा खेळ खंडोबा करत आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे. कंपनीच्या प्रमुख पदांवरील व्यक्तीला किमान तीन वर्षे तरी बदलू नये, अशी मागणी जोशी यांनी पत्रात केली आहे.