पुणे राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश जवळपास फुल झाले आहेत. आतापर्यंत ९१ हजार ११७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, प्रवेशासाठी आणखी दोन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत पहिल्यांदाच आयटीआयमध्ये एवढे प्रवेश झाले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शासकीय आयटीआयवर विद्यार्थ्यांच्या उड्या पडल्याचे दिसते.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील शासकीय व खासगी ‘आयटीआय’मधील प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू आहेत. ही प्रक्रिया दि. १ जूनपासून सुरू झाली आहे. राज्यात एकूण ४१७ शासकीय व ४९१ खासगी आयटीआय आहेत. शासकीय संस्थांमध्ये एकूण ९४२४८ प्रवेश क्षमता आहे. दोन्ही संस्थांमधील प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या शासकीय संस्थांमधील समुपदेशन फेरी असून, ही प्रक्रिया दि. १८ आॅगस्ट रोजी पूर्ण होणार आहे. तर खासगी संस्थांची संस्थास्तरावरील प्रवेशप्रक्रिया दि. ३१ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. आतापर्यंत शासकीय संस्थांमध्ये ९१ हजार ११७ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशासाठी अद्याप दोन दिवस शिल्लक असल्याने आणखी प्रवेश होण्याची शक्यता आहे. मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या प्रवेशात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत एकूण प्रवेशक्षमतेच्या ९६.६८ टक्के प्रवेश झाले असून, आतापर्यंतची हे विक्रमी प्रवेश असल्याची माहिती संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी दिली.आयटीआयमध्ये प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा तिप्पट अर्ज आले होते. त्यामुळे यंदाही प्रवेशासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. शासकीय संस्थांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी खासगी संस्थांकडे वळतात. त्यामुळे पुढील दोन दिवसांनंतर खासगी आयटीआयमधील प्रवेश वाढतील. ही प्रक्रिया दि. ३१ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेशाची संधी आहे. शासकीयप्रमाणे खासगी संस्थांमधील प्रवेशही या वर्षी काही प्रमाणात वाढतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
शासकीय आयटीआय फुल, प्रवेशक्षमतेच्या ९६.६८ टक्के प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:45 AM