बारामती (पुणे) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन सत्ताबदल झाला आहे. राज्यात सरकार बदललेले आहे, मात्र पुणे जिल्ह्यात सरकार बदललेले नसल्याचे वातावरण आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशा शब्दात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीत प्रशासनाविरोधात तक्रार केली.
बारामती येथे भाजप जिल्हा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी मंंत्री पाटील यांनी राज्यात सत्तांतर होऊन देखील प्रशासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालावर चालत असल्याची अप्रत्यक्षरीत्या तक्रार केली. यावेळी पाटील यांनी आक्रमकपणे बाजु मांडली. पाटील पुढे म्हणाले, मागील अडीच वर्षांत आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या अर्जाला केराची टोपली दाखविण्यात आली. आज विरोधी पक्षातील काही लोक रात्री अपरात्री आपल्या लोकांना भेटतात. त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतात. मी तूमचाच असल्याचे सांगतात, आमची कामे मंजूर करण्याची मागणी करतात. भाजप नेत्यांना भेटण्याबाबत अडचण नाही. मात्र, भाजपने येथील कार्यकर्त्यांसाठी इथून पुढील काळात ‘फाटी’ आखून राजकारण करण्याची वेळ आली आहे. याबाबत बावनकुळे यांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी पाटील यांनी केली.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांचे सरकार आले आहे. त्यामुळे पुढील काळात कार्यकर्त्यांनी काळजी करु नका, बोलण्यापेक्षा आपण कृतीतून ताकत दाखवून द्या, असे आवाहन पाटील यांनी केले. बारामती लोकसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार निवडून आणण्याची पाटील यांनी उपस्थितांसमवेत शपथ घेतली.