सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे राजकारण्यांच्या हातून; पुण्यातून काँग्रेसची टीका
By राजू इनामदार | Published: May 17, 2023 04:31 PM2023-05-17T16:31:25+5:302023-05-17T16:31:40+5:30
राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार बंद करावा व सर्व पदे योग्य त्या यंत्रणांमार्फत रितसर पद्धतीने भरावीत असे काँग्रेसचे म्हणणे
पुणे: सरकारी नोकरी सरळ सेवा भरतीने करण्याचे टाळून तात्पुरत्या स्वरूपात नोकरी द्यायची, व त्याचीही नियुक्ती पत्रे सरकारमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांकडून द्यायची या प्रकारावर काँग्रेसने टीका केली आहे. राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रकार बंद करावा व सर्व पदे योग्य त्या यंत्रणांमार्फत रितसर पद्धतीने भरावीत असे काँग्रेसने म्हटले आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून मंत्री अथवा अन्य लोकप्रतिनिधींच्या हस्ते अशा प्रकारच्या तात्पुरत्या सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे मेळावे आयोजित करून दिली जात आहेत. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, अशा प्रकारे सरकारी नोकरी देण्याचा प्रकार आधीच्या कोणत्याही सरकारमध्ये झालेला नाही. सर्व पदे ही सरळ सेवा भरतीने रितसर परिक्षा, मुलाखत दिल्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर व तीसुद्धा लोकसेवा किंवा राज्य सेवा आयोगाच्या माध्यमातून जमा केली जात असत.
सध्या सरकारी नोकर भरती जवळपास बंदच करण्यात आली आहे. त्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या दिल्या जातात. या नियुक्त्या करण्याआधी निवड कोणत्या पद्धतीने केली जाते, त्यात पारदर्शकता नाही. शिवाय ज्यांची नियुक्ती केली जाते, त्यांना नियुक्ती पत्रे राजकीय नेत्यांच्या हस्ते, मेळावा वगैरे आयोजित करून दिली जातात. हा सर्वच प्रकार निषेधार्ह असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.
यातून संबधित सरकारी नोकरदाराला उपकृत केल्याची भावना निर्माण होते. सरकारी नोकरदापाकडून जनसामान्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिनेे ही गोष्ट गैर आहे. त्यामुळे सरकारनेच ही नवी, अन्यायकारक पद्धत त्वरीत थांबवावी, अन्यथा न्यायालयाने स्वत: याची दखल घ्यावी व सरकारला समज द्यावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.