पुणे : दर वर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी हजारो लोक येतात. यंदा २०० वर्षे पूर्ण होत असल्याने लाखो लोक येथे येणार, याची सरकार आणि प्रशासनाला माहिती होती. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, समाजात जातीय तणाव आणि वितुष्ट निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारनेच ही दंगल घडवून आणल्याची दाट शक्यता आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.पुण्यात पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, दादरला दर वर्षी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी पाच-सहा लाख लोक एकत्र येतात. यावेळी कोणताही गोंधळ किंवा वाहतूक कोंडीही होत नाही. कोरेगाव भीमा येथेही अशा प्रकारचे नियोजन करायला हवे होते. मात्र, सरकारने कोणतेही नियोजन केले नाही. दगडफेक कशी सुरू झाली, पहिला दगड कोणी फेकला, त्यामागील सूत्रधार कोण, याबाबत सरकार काहीही बोलायला तयार नाही. दंगलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सर्व प्रकार सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे. याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात न आल्याने हा पूर्वनियोजित कट असल्याचे उघड झाले आहे.२०१४ मध्ये सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, सरकारच्या धोरणामुळे दलित, मुस्लिम मतदार दुरावला आहे. यामुळे निवडणुकीआधीच हार पत्करावी लागू नये, यासाठी, दलितांना एकटे पाडण्यासाठी आणि दोन समाजांमध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी भाजप सरकारने हा कट रचला. आपापसात वितुष्ट, वैमनस्य निर्माण झाल्यास दोन्ही समाज एका व्यासपीठावर येणार नाहीत, असे नियोजन करण्यात आले. मूळ प्रकरणापासून लक्ष वळवण्यासाठी अनेक नावे गोवून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. खºया सूत्रधाराना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोवर समाजाला सावध राहावे लागणार आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.कॉँग्रेस, राष्टÑवादीने एकत्र यावे : ‘सहकारी चळवळ, आर्थिक संस्थाचे नेतृत्व यातून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झाला. मात्र, सध्याचे वैचारिक आक्रमण मोडून काढायचे असेल तर हेवेदावे बाजूला ठेवून विषारी शक्तींचा सामना केला पाहिजे. एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळले तर भाजपला घरी बसवण्याची ही चांगली संधी आहे, असेही चव्हाण म्हणाले.फटांगडे कुटुंबीयांना १० लाखांची मदतकोरेगाव भीमा (पुणे) : कोरेगाव भीमा येथील दंगलीत मृत्यू झालेल्या राहुल फटांगडे याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० लाखांची शासकीय मदत जाहीर केली होती. संबंधित धनादेश त्याच्या कुटुंबीयांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले व प्रांताधिकारी भाऊ गलंडे यांनी मंगळवारी सुपूर्द केला. मूळचा कान्हुर मेसाई (ता. शिरुर) येथील व सध्या सणसवाडी येथे राहणा-या राहुलचा चंदननगर येथे गॅरज होते.
कोरेगाव-भीमाची दंगल सरकारनेच घडवून आणली! पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:31 AM