लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सगळीकडे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाची चर्चा सुरू आहे. मात्र, बहुसंख्य सरकारी कार्यालये सुस्तच आहेत. सुरूवातीच्या काळात कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेली सॅनिटायझरची बाटली इतिहासजमा झाली आहे. मास्कही केवळ हनुवटीवर अडकवण्यासाठीच शिल्लक राहिला आहे.
कोरोनाच्या सुरूवातीच्या टप्प्यात सरकारी कार्यालयांनी प्रवेशद्वाराव र सॅनिटायझरची बाटली ठेवली होती. पायाचा दबाव टाकल्यानंतर हाताच्या ओंजळीत सॅनिटायझरची पिचकारी उडवणारे यंत्र अनेकांनी खास खरेदी केली होते. कार्यालयात येणाºयांची नावनोंदणी केली जात होती. त्यांची ऑक्सिजन पातळी व तापही तपासला जात होता. कर्मचाºयांनाही मास्क लावणे सक्तीचे केले होते.
हे सगळे नियम बहुसंख्य कार्यालयांनी आता धाब्यावर बसवले आहेत. भूजल सर्वेक्षण व विकास कार्यालयात या नियमांची चोख अंमलबजावणी केली जात होती. तिथेही आता ढिलाई आली आहे. कृषी संशोधन परिषद, कृषी भवन, साखर संकुल व तेथील कार्यालये यापैकी कुठेही आता सॅनिटायझर नाही. कार्यालया प्रमुखांनी मास्क लावलेला असतो, मात्र कर्मचारी विनामास्कच फिरत असतात. कामाकरता आलेल्या नागरिकांची आता नावेही घेतली जात नाहीत तर तपासणी वगैरे करणे दूरच.
सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असणाऱ्या स्थानकांवर, शहरातील रिक्षा थांब्यांवर तसेच हॉटेल्समध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. या सर्व ठिकाणांना राज्य सरकारने टाळेबंदीनंतर ती सुरू करताना नियम ठरवून दिलेले होते. काही काळ त्याचे पालन करण्यात आले, नंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. आता कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाही कोणी त्या नियमांचे पालन करताना दिसत नाही. मास्कचा वापर करणे आवश्यक आहे असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत असतानाही सरकारी कार्यालये व नागरिकांकडूनही त्याकडे डोळेझाक केली जात आहे.