लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असताना व शासनाने सरकारी, निमसरकारी तथा खासगी आस्थापनांना कार्यालयात ५० टक्केच कर्मचारी उपस्थितीचे आदेश असताना केवळ मार्च एंडमुळे सर्वच सरकारी कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. एवढेच नाही तर मार्चअखेरची कामे पूर्ण करणे, बिल काढणे, वसुली, कामांना प्रशासकीय कामांना मान्यात देणे आदी विविध कामांसाठी कर्मचाऱ्यांची उपस्थिती देखील शंभर ते नव्वद टक्क्याच्या घरात आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग येऊन एक वर्षाचा कालावधी लोटला. गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यानंतर विविध पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या. यामुळेच काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर शासनाने सर्व गोष्टी अनलाॅक केल्या आणि गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर तर नागरिक प्रचंड बेफिकीर झाले. यामुळेच गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा प्रचंड उद्रेक झाला आहे. त्यात मार्च अखेरमुळे तर सरकारी कार्यालयात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत.
-----
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती
कोरोनाचे एकूण रुग्ण -४ लाख ८६ हजार २६२
बरे झालेले रुग्ण - ४ लाख ३० हजार ६२१
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - ४६ हजार १२८
कोरोनाबळी -९ हजार ६८२
-------
पुणे जिल्हा परिषद
मार्च अखेरमुळे पुणे जिल्हा परिषदेत ठेकेदार, लोकप्रतिनिधी यांची प्रचंड गर्दी होत आहे. जिल्हा परिषद सदस्य आपल्या सोबत किमान पाच-दहा कार्यकर्ते घेऊनच फिरताना दिसत आहेत. तर मार्च अखेरच्या कामामुळे अधिकारी, कर्मचारी उपस्थितीदेखील शंभर टक्के दिसते. पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सव्वाचारशे कर्मचारी काम करत असून, सध्या उपस्थितीती ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. एवढेच नाही तर सुट्टीच्या दिवशीदेखील कार्यालय सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.
---------
भूमि अभिलेख विभाग
नवीन प्रशासकीय इमारतीत असलेल्या भूमि अभिलेख विभागात सर्वसामान्य नागरिकांची गर्दी कमी असली तरी, मार्च अखेरच्या विविध स्वरूपाच्या कामांसाठी कर्मचारी उपस्थितीती शंभर टक्क्यांच्या घरात आहे. शासनाच्या ५० टक्के कर्मचारी उपस्थितीची अंमलबजावणी १ एप्रिलनंतर करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या कार्यालयात सुमारे १४६ कर्मचारी काम करतात.
--------
जिल्हाधिकारी कार्यालय
पाॅझिटिव्ह कर्मचाऱ्यांना देखील आठ दिवसांत कामावर हजर राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयच सध्या कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरत आहे. सध्या मार्च अखेरच्या कामामुळे कार्यालयात येणा-या नागरिकांची संख्या प्रचंड तर आहेच, पण कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरू आहे. काही विभागात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचा-यांना आठ-दहा दिवसांतच कामावर हजर राहण्याचे आदेश दिले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यालयात सुमारे २५०-३०० कर्मचारी काम करतात.