पुणे येथे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तालुक्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम घेण्याचे ठरले होते. त्यामुळे तळेघर व अडिवरे येथे हा उपक्रम घेण्यात आला. या शिबिरास पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, आदिवासी सेवक शंकर मुद्गुण, सरपंच गोविंद पारधी, संदीप चपटे, हौसाबाई असवले, हौसाबाई गभाले, मारूती जढर, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, प्रदीप आमोंडकर, उगले गुरुजी इत्यादी उपस्थित होते.
या शिबिरात वारस नोंदी, रेशनकार्ड, सातबारावरील चुकीच्या दुरुस्ती, झाडांच्या नोंदी, वाढीव क्षेत्राची नोंद, खाते वाटप, संजय गांधी निराधार योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांना लाभ देणे इत्यादी कामे या उपक्रमातून करण्यात आली. अडिवरे व तळेघर या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांचे जातीचे दाखले, रेशनकार्ड, उत्पन्नाचे दाखले तयार झाले, त्यांचे वितरण लगेच करण्यात आले.
प्रत्येक सोमवार, बुधवार, गुरुवारी मध्यवर्ती ठिकाणी या दाखल्यांचे काम सुरू राहणार आहे. यासाठी शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, गावातील होतकरू कार्यकर्ते यांची मदत घेऊन जातीचे दाखले व इतर कामे दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण करणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.
अडिवरे येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात दाखल्याचे वाटप करताना सभापती संजय गवारी.