पुणे : जिल्हा परिषद ग्रामीण क्षेत्रातील महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना हवेली आणि मुळशी तालुक्यांच्या बाहेरील तालुक्यांमध्ये समुपदेशन करून नेमणुका देण्याच्या सूचना शासनाने दिले आहेत. त्यामुळे नियतकालिक बदल्यांची प्रक्रिया पार पडण्यापूर्वी ग्रामविकास अधिकारी दर्जाचे ग्रामपंचायत सजे निश्चित करून ज्या ग्रामसेवकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.
२३ गावांचा समावेश महापालिकेत झाल्यामुळे या गावांमधील ग्रामसेवक हवेली आणि मुळशी तालुक्यामध्ये अतिरिक्त झाले आहेत त्यांच्याबद्दल यासंदर्भात जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागाकडून मार्गदर्शन मागवले होते. शासनाने यासंदर्भात जिल्हा परिषदेला या ग्रामसेवकांच्या नियुक्त्या कशा पद्धतीने कराव्यात या संदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
हवेली तालुक्यातील अतिरिक्त ग्रामसेवकांना समुपदेशन करून बाहेरच्या तालुक्यांमध्ये नेमणूक दिली जाईल त्याच धर्तीवर मुळशी तालुक्यातील अतिरिक्त ग्रामसेवकांच्या नेमणुका देखील होणार आहेत. सद्यस्थितीमध्ये हवेली आणि मुळशी तालुक्यात एकही जागा रिक्त नाही त्यामुळे या ग्रामसेवकांना हे दोन तालुके सोडून बाहेरच्या तालुक्यांमध्ये समुपदेशन पद्धतीने नियुक्ती दिली जाईल असे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा परिषद कर्मचारी तसेच ग्रामसेवक यांच्या नियतकालिक बदल्या १५ टक्के या यादीमध्ये ३१ जुलैपूर्वी करायच्या आहेत. त्या अगोदर या २३ ग्रामपंचायतींमधील अतिरिक्त ग्रामसेवकांच्या निवडणुकांची प्रक्रिया केली जाणार आहे. मुळशी आणि हवेली गटविकास अधिकाऱ्यांकडून या ग्रामसेवकांना अनेक प्रकरणांमध्ये पाठीशी घातले गेले. परंतु यातील अनेक ग्रामसेवकांच्या खाते अंतर्गत चौकशी देखील सुरू आहेत.