पुणे : येत्या १४ मार्चला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. आणि या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले. यापूर्वीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळून आली. याच रोषातून 'एमपीएससी'च्या उमेदवारांनी पुण्यात रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व 'एमपीएससी'चा तीव्र निषेध व्यक्त केला.
मागील वर्षभरात कोरोना प्रादुर्भाव आणि मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या निर्णयाचा चांगलाच फटका बसला. याच धर्तीवर पुण्यात विद्यार्थयांनी एमपीएससी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, बंद करा बंद करा, एमपीएससीचे गाजर दाखवणे बंद करा यासारखी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला.
आंदोलनकर्ता एक उमेदवार म्हणाला, कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना देखील मी महिन्यात यूपीएससीची परीक्षा झाली. आता तर कोरोना लस उपलब्ध असताना सरकारने ऐनवेळी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली आहे.हे सरकार विद्यार्थ्याच्या भावनांशी खेळत आहे. मागील दोन वर्षांपासून एमपीएससीची परीक्षा झालेली नाही. आता आम्ही करायचे काय? असा सवालही या विद्यार्थ्याने उपस्थित केला.
दुसरा विद्यार्थी म्हणाला, आमचे आई- वडील शेतात कष्ट करून आम्हाला पैसे पाठवतात.गेल्या २ वर्षांपासून बाकी सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीची परीक्षाच घेतल्या जात नाही.त्यामुळे आमचे कुटुंब कर्जबाजारी झाले आहे. आम्ही सर्व जण एमपीएससीकडे आशेचा किरण म्हणून पाहत असताना हे सरकार आमच्या आयुष्यातील महत्वाचे वर्ष वाया घालवू पाहत आहे.या सरकारचा करावा तेवढा निषेध कमी आहे.
आंदोलनकर्ती युवती म्हणाली, आधीच ग्रामीण भागातील कुटुंबाकडून आम्हाला एमपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी परवानगी मिळत नाही. अशा परिस्थितीत आम्ही कुटुंबांशी वाद घालून अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन दिवसरात्र अपार कष्ट घेतो. आणि परीक्षेच्या ऐन तोंडावर सरकार परीक्षा पुढे ढकलत आहे. यामुळे होणारा प्रचंड मानसिक संताप निर्माण होतो.
'पुण्यात MPSC चे हजारो विद्यार्थी रस्त्यावर; गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारापुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला, यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून ठाकरे सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या, आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंय, UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का? MPSC परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचं राजकारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
'एमपीएससी'ची तारीख पे तारीख!येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.याबाबतची अधिकृत माहिती एमपीएससीने परिपत्रकाद्वारे दिली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील पत्रकात म्हटले आहे. मात्र पूर्ण तयारी झालेली असताना अगदी तीन दिवस अगोदर परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.