पुणे : माळी समाजाच्या मागण्यांकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहेत. सरकारने संयमाची परीक्षा पाहू नये, समाज रस्त्यावर उतरल्यास सरकारला पळता भुई थोडी होईल, असा इशारा माळी समाजाच्या महारॅलीतून देण्यात आला.क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. हा दिवस यंदाही फुले दांपत्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी रॅलीत सहभागी मान्यवरांनी हा इशारा दिला. या रॅलीत क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले फोरमचे चेअरमन अविनाश ठाकरे, महारॅलीचे राज्य संयोजक राजेंद्र गिरमे, पुणे जिल्हा संयोजक अश्विन गिरमे, समर्थ परिवाराचे जगन्नाथ लडकत, माजी आमदार दीप्ती चवधरी,आदी उपस्थित होते. या महारॅलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून माळी समाजातील बंधू-भगिनी, समविचारी व्यक्ती, कार्यकर्ते आणि फुले विचार प्रचारक-प्रसारक अशा हजारो समविचारी व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.भिडे वाडा येथे रॅलीची सुरुवातभिडे वाडा येथे सुरू झालेल्या या महारॅलीत सजविलेले रथ, लेझीम आणि ढोल पथक यासह फुले विचारांचे फलक हाती घेऊन माळी समाज बांधव सहभागी झाले होते. भिडे वाडा येथून या महारॅलीचा प्रारंभ झाला. दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलीस चौकी चौक, मार्गे महाराणा प्रताप रस्त्यावरुन रॅली फुले वाड्याकडे आली. तेथे रॅलीचे सभेत रुपांतर झाले.संयुक्तपणे ‘भारतरत्न’ द्या!भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करावे, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना संयुक्तपणे भारतरत्न पुरस्कार द्यावा, महात्माफुलेंचे समग्र साहित्य पुन:प्रकाशित करावे, ओबीसींची जनगणना घोषित करावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
सरकारने माळी समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नये, पुण्यात महारॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 4:11 AM