पुणे : राज्यातील सर्व महापालिकांना सार्वजनिक प्रवासी सेवेसाठी वाहने घेण्यास निधी द्यावा व पुणे महापालिकेने मंजूर केलेल्या सायकल आराखड्यास मंजूरी द्यावी अशी मागणी खासदार वंदना चव्हाण राज्य सरकारकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या चव्हाण अध्यक्ष आहेत. पुणे महापालिकेने सर्वकष सायकल आराखडा तयार केला आहे. त्याला सर्वसाधारण सभेत मंजूरी घेतली आहे, मात्र राज्याच्या नगरविकास विभागाकडून तो अधिसुचित होण्याची गरज आहे. महापालिकेनेच तो करून घ्यायला हवा, मात्र महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते आहे. याबाबत त्वरीत पावले उचलावीत असे खासदार चव्हाण यांनी नगरविकास विभागाला कळवले आहे.
मोठ्या शहरांत प्रत्येकी १ लाख लोकसंख्येमागे किमान ४० ते ६० सार्वजनिक प्रवासी वाहने हा निकष गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाने निश्चित केलेला आहे. त्यानुसार पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरांत अशी सार्वजनिक वाहने खरेदी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देण्याची गरज आहे. अर्बन सेल व परिसर संस्थेतर्फे खासदार चव्हाण, ‘परिसर’चे रणजीत गाडगीळ यांनी परिवहन विभागाकडे सार्वजनिक प्रवासी सेवेच्या वाहन खरेदीसाठी निधीची मागणी केली आहे.