पुणे : समृध्दी महामार्गावरील भीषण दुर्घटनेनंतर वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. या महामार्गावर अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेत जखमी प्रवाश्यांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
समृध्दी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्यावतीने सातत्याने करण्यात आली आहे. शासनाने आतातरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा. समृध्दी महामार्ग हा काॅक्रीटचा रस्ता आहे. रात्रीच्या वेळी तो तापण्याचा प्रश्नच येत नाही . रात्री वेगाने चालणा०या गाडयामुळे या रस्त्यावर टायर तापतात का त्यातुन दुर्घटना घडतात का हे तपासुन घेण्याची गरज आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.
कार्यक्रम केले रदद
नागपुरहुन पुण्याला येत असताना समृध्दीमहामार्गावर सिंध्दखेडराजा जवळ खाजगी बसला झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या दुर्घटनेमुळे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शनिवारचे सर्व कार्यक्रम रदद केले आहेत. पुण्यातील सदाशीव पेठ येथे क्रांती अग्रणी अभ्यासिकेचे उद्घाटन होणार होते. राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अभ्यासिकेचे सकाळी दहा वाजता होणाऱ्या उद्घाटनासाठी सगळे हजर झाले होते. अपघाताच्या घटनेमुळे अजित पवार यांच्याकडुन ते कार्यक्रमला येणार नसल्याचा निरोप देण्यात आला.
अपघातस्थळी जाण्याचा प्रयत्न करत आहे
अपघाताच्या घटनास्थळी जाणार आहे. पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने जाण्यात अडचणी येत आहे. खाजगी विमानाने जाण्याचा प्रयत्न करत आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.