शिरूर तालुका जय मल्हार क्रांती संघटनेचे वतीने आयोजित आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंतीनिमित्त विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शिरूर येथे आले होते. त्यावेळी कार्यक्रमानंतर माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमास माळशिरसचे आमदार राम सातपुते, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, माजी आमदार योगेश टिळेकर, जयमल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा संपर्क प्रमुख धर्मेंद्र खांडरे, उद्योग आघाडीचे संजय पाचंगे, भाजपा शिरूर तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे उपस्थित होते.
प्रवीण दरेकर म्हणाले, महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. सरकारचे पोलिसांवर नियंत्रण नसल्यामुळे अशा प्रकारची अराजकता माजली आहे. महिलांवर अत्याचार व गुन्हेगारीच्या घटना पुण्यासारख्या शैक्षणिक नगरीत घडणे ही गोष्ट न शोभणारी व लांच्छनास्पद आहे. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व गृहमंत्री हे पुण्यातील असून, त्यांनी यावर कठोर उपाययोजना कराव्यात. तसेच केंद्रीय महिला आयोगाने हे राज्य सरकारचे अपयश असल्याचे सांगितले असून, दोन वर्षे होऊनही राज्य महिला आयोगाची नेमणूक केली नाही. त्यावरून महिलांप्रती सरकार किती संवेदनशील आहे, हे दिसून येते, असेही दरेकर म्हणाले.