लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : एकीकडे कोरोना लस सुरक्षित आहे, ज्येष्ठांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन शासन करीत आहे. त्याच वेळी बारामतीत मात्र वेगळे चित्र पाहावयास मिळाले. बारामती शहरात कोरोना लसीचा शासकीय साठा संपला आहे. या बाबत अनभिज्ञ असलेले अनेक नागरिक शनिवारी (दि. १३) लसीकरणासाठी महिला रुग्णालयात गेले होते. त्यांना लस संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिक लसीकरण न करताच माघारी फिरले.
बारामती शहरातील एमआयडीसीतील महिला रुग्णालयात कोविड १९ लसीकरण सुरू आहे. कोरोना वॉरियरसह नावनोंदणी केलेल्या ज्येष्ठांचे येथे मोफत लसीकरण सुरू आहे. १६ जानेवारीपासून कोरोना योद्ध्यांना लसीकरण सुरू आहे, तर १ मार्चपासून ज्येष्ठांना लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण मोहीम प्रगतिपथावर असताना शनिवारी लस संपल्याचे अचानक सांगण्यात आले. बारामतीत रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच भर उन्हात लसीकरणासाठी गेलेल्या नागरिकांनी लस न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. बारामतीत आज लस संपल्याचे अनेकांना लस न घेताच माघारी जावे लागले. आज सायंकाळी लस बारामतीत उपलब्ध होणार असल्याचे चिंता करण्याचे कारण नाही, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाची आकडेवारी वाढतच आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी कोरोनाचा येथील आलेख घसरला होता. बारामतीकरांनी कोरोनावर नियंत्रण मिळविल्याचे चित्र होते. मात्र, आता चित्र बदलले आहे. १ ते १२ मार्चदरम्यान बारामतीत ६८२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. फेब्रुवारीमध्ये १० ते १५ रुग्णांची संख्या आता सरासरी प्रति दिन ६० रुग्णांवर गेली आहे. गेल्या १२ दिवसांत ९ मार्च रोजी सर्वाधिक ८० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दिवसेंदिवस वाढत्या कोराना रुग्णांच्या संख्येने बारामती शहर आणि तालुक्यात चिंता वाढत आहे. कोरोनाचा आलेख वाढत असल्याने, नागरिकांनी अधिक सावध आणि दक्षता घेण्याची गरज आहे. प्रशासनाने उपाययोजना आणि दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
दंडात्मक कारवाई सुरू
तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी पोलिसांच्या मदतीने कोरोना रोखण्यासाठी थेट रस्त्यावर उतरत उदासीन नागरिकांवर कारवाई केली. एकाच दिवशी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून ५४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर प्रत्येक चौकात कारवाई सुरू केली आहे. आता विनामास्क फिरणाऱ्या महाभागांकडून ५०० रुपये दंड आकारण्यास सुरुवात झाली आहे.
शनिवारी २४ तासांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. यामध्ये बारामती शहरातील ४५ आणि ग्रामीणमधील २३ रुग्णांचा समावेश आहे. अडीच महिन्यांत प्रथमच आज ६८ उच्चांकी रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांबरोबरच प्रशासनही धास्तावले आहे. बारामतीची आजपर्यंतची रुग्णांची संख्या ७,४७३ वर पोहोचली आहे, तर ६,७५१ रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत, तसेच आजपर्यंत एकूण १४८ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.
——————————————————