लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खरीप हंगामासाठी सरकार शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानात वेगवेगळ्या वाणाची बियाणे देणार आहे. यासाठी १५ मेपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची मुदत आहे. आधार कार्ड नोंदणी क्रमांक असेल, त्यांनाच अनुदान मिळणार आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोठे यांनी ही माहिती दिली. सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘अर्ज एक, योजना अनेक’ असे महाडीबीटी पोर्टल तयार केले आहे. याच पोर्टलवर शेतकरी योजना यावर क्लिक करून त्यातील बियाणे या रकाण्यात शेतकऱ्यांना आपली बियाणांची मागणी नोंदविता येईल.
सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका व बाजरी तसेच खरीपातील अन्य काही पिकांची दर्जेदार व विकसित केलेली बियाणे यात शेतकऱ्यांना किमतीच्या ५० टक्के अनुदानात उपलब्ध होतील. त्यासाठी आधार कार्ड नोंदणी क्रमांक सक्तीचा आहे. हा क्रमांक असेल तरच अनुदान वितरीत होईल. याच्यात काही तांत्रिक अडचण आल्यास इच्छुक शेतकऱ्यांनी ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी कार्यालयाने केले आहे.