लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या टाळेबंदीतून उद्योग-व्यवसाय सावरत नाही तोच दुसरा तडाखा बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच व्यवसायावर निर्बंधांचे सावट आल्याने पुढील वर्ष कसे जाणार या विवंचनेत व्यापारी वर्ग अडकला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ७० टक्के व्यवसायाला फटका बसणार असून शासकीय कर, जीएसटी, वीज बिल आणि दुकानांची भाडी कोठून भरायची? कामगारांचा पगार कसा करायचा असा उद्विग्न सवाल व्यापारी विचारु लागले आहेत.
शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंशत: टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. याबद्दल व्यापाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. या निर्णयाचा फटका सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना बसणार असल्याची काळजी त्यांनी व्यक्त केली.
प्रशासन उपाययोजना राबविण्यात तसेच कोरोनाच्या साथीला आळा घालण्यात कमी पडत आहे. वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. जर संध्याकाळी सहा वाजता दुकाने बंद करायची असतील तर पाच वाजल्यापासूनच दुकाने बंद करायला घ्यावी लागतील. सहानंतर संचारबंदी असल्याने कामगारांना लवकर घरी सोडावे लागेल. त्यातच पीएमपी बस सेवा बंद असल्याने अनेक कामगारांना घरी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. प्रशासनाने निर्बंध लादताना प्राथमिक बाबींचा विचार केलेला नसल्याचा संताप व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
चौकट
“प्रशासनाच्या निर्णयावर व्यापारी नाराज आहेत. उन्हामुळे तसेच नोकरी-व्यवसायामुळे लोक दुपारी बाहेर पडत नाहीत. संध्याकाळी व्यवसायाची प्रमुख वेळ असते. यावेळेतच दुकाने बंद होणार असतील तर मोठे आर्थिक नुकसान होणार. व्यवसाय कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. नियम पाळून, खबरदारी घेऊनही व्यापाऱ्यांवर अन्याय का? कामगारांचे पगार, वीज बिल, जीएसटी, शासकीय कर कोठून अदा करायचे?”
- सिद्धार्थ शहा, चंदूकाका सराफ ज्वेलर्स
====
“प्रशासनाकडून एकप्रकारे लॉकडाऊनचेच वातावरण निर्माण केले जात आहे. त्याचा फटका लहान-मोठ्या सर्वच व्यवसायांना बसणार आहे. सहानंतर संचारबंदी असल्याने कर्मचाऱ्यांना पाच वाजताच घरी सोडावे लागेल. दुपारनंतर ग्राहकही दुकानात येणार नाहीत. लोक संध्याकाळीच खरेदीला बाहेर पडतात त्याच वेळात निर्बंध लादलेत. या वेळेत जवळपास ६०-७० टक्के व्यवसाय होत असतो. त्याला फटका बसेल.”
- दिनेश जैन, जयहिंद कलेक्शन