पुणे : वेगवेगळी आश्वासने आणि विकासांची स्वप्ने दाखवून सर्वसामान्य माणसांची मते मिळविण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी झाला. मात्र त्यानंतर आपल्या जातधर्माच्या नावाने तयार केलेल्या विचारकलहामुळे समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकांमध्ये जातपातीचे भेद पसरविणारे व मनस्मृतीचे समर्थन करणारे हे मनुवादी विचारांचे सरकार धोकादायक असल्याचे मत युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.युवक क्रांती दल, जागरूक पुणेकर मंच आणि ईव्हीएमविरोधी मंचतर्फे आयोजित ‘मनुस्मृती की भीमस्मृती’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. कुमार सप्तर्षी बोलत होते. दीपाली भांगे, मयुरी शिंदे, प्रशांत कनोजिया, जांबवंत मनोहर, दिलीपसिंग विश्वकर्मा आदी या वेळी उपस्थित होते.तरुणांनी अधिक सावध राहण्याची गरजडॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली तेव्हा वैचारिक क्रांती झाली, परंतु अनेक जणांच्या मनात आजही मनुस्मृती जिवंत आहे. ब्राह्मण्यवादाच्या नावाखाली आजही काही समाज इतरांना आपल्या आधिपत्याखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, यासाठी रोजच्या व्यवहारातून आणि आपल्या विचारांमधून मनुस्मृती दूर करणे गरजेचे आहे.विकासाचे स्वप्न दाखवून भारतीय जनता पक्षाने लोकांची मते मिळविली, परंतु विकास करणे आपल्या आवाक्यात नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची धोरणे राबवायला सुरुवात केली, मनुस्मृतीच्या विचारांचे सरकार देशासाठी घातक आहे. याबरोबरच अच्छे दिन येणार आणि विकास होणार असल्याची स्वप्न भाजपाने दाखविली; परंंतु आज विकासाचा अजेंडा बाजूला राहिला.जात आणि धर्माचे राजकारण करून आज जात अधिक बळकट केली जात असून, काही समाजामध्ये भीती निर्माण केली जात आहे. यामुळे आपणच कायम सत्तेत राहू, हा त्याचा भ्रम असून यासाठी तरुणांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.
मनुवादी विचारांचे सरकार धोकादायक : डॉ. सप्तर्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:21 AM