पुणे : राज्यात शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा गेल्या काही दिवसापासून महावितरणने पुर्णपणे खंडित केला होता. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, जनावरांच्या व माणसांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे दिसून आले. त्यावर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलने केली. तर काही मंत्र्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा दिला. त्यावर भाष्य करताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
''भाजपने लावलेल्या सवयीमुळेच महावितरण अडचणीत असल्याचे ते म्हणाले आहेत. तर वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागणार असेही त्यांनी यावेळी संगितले आहे. पुण्यात बावधन येथे नाना पटोले यांच्या मुलीच्या लग्नात आले होते. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राऊत म्हणाले, वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली. वीज फुकटात तयार होते की, हवेतून तयार होते की पाण्यातून तयार होते. विजेला लागणारा कोळसा विकत घ्यावा लागतो, विजेचा प्लांट चालवण्यासाठी पैसे लागतात. कर्ज काढावे लागते, त्यासाठी बँकेला व्याज द्यावे लागते. मग वीज वापरता तर बिल देण्यासाठी अडचण काय आहे.
''मी जेव्हापासून या खात्याचा पदभार सांभाळला तेव्हापासून २४ तास वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न केला. चक्रीवादळाच्या, अतिवृष्टीच्या काळातही हा प्रयत्न केला. मुंबई अंधारात असतानाही सातत्याने वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न केला याकडे कुणाचाही लक्ष नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही कृषीपंप, विजजोडणीचा कार्यक्रम आणला. भरलेल्या वीजबिलातून ६६ टक्के रक्कम ही संबंधित जिल्ह्याला दिली जाते. त्यातून विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करू शकता, नवीन ट्रान्सफॉर्मर घेता येऊ शकतात, नवीन लाईन टाकता येते तर मग विजेचे बिल का भरत नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. महावितरणवर ५६ हजार कोटींचा बोजा आला आहे. हे पैसे महावितरण कुठून आणणार. त्यामुळे लोकांना वीजबिल प्रत्येकाला भरावेच लागेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.''