शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील पाणीप्रश्न सोडविण्याबरोबरच खेड व आंबेगाव तालुक्यांतील काही गावांच्या पाणीप्रश्नाबाबत योग्य उपाययोजना कारणासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचबरोबर बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्यासोबत बैठक झाली असून, वटहुकूम काढून बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
पाबळ (ता. शिरूर) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार यार्डाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, बाजार समितीचे सभापती ॲड. वसंतराव कोरेकर, उपसभापती प्रवीण चोरडिया, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, ‘भीमाशंकर’चे संचालक प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, शंकर जांभळकर, मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे, स्वाती पाचुंदकर, शेखर पाचूंदकर, दूध संघाच्या संचालिका केशर पवार, वर्षा शिवले, सदाशिव पवार, सुभाष उमाप, उपसभापती सविता पऱ्हाड, तालुकाध्यक्ष रवी काळे, नंदकुमार पिंगळे, राजेंद्र गावडे, शांताराम चौधरी, अरुण चौधरी, किशोर रत्नपारखी, सचिव अनिल ढोकले, आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
वळसे-पाटील म्हणाले, शिरूर भागातील शेतकरी बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. याबाबत मुंबईत बैठक घेण्यात आली. वटहुकूम काढून बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे; परंतु याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. मुख्य न्यायाधीशांना याबाबत न्यायाधीशांचा बेंच स्थापन करण्याबाबत अर्ज करण्यात आला आहे. पाच न्यायाधीशांच्या बेंच स्थापन झाल्यावर बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने उत्तम वकील दिले जातील, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.
विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षात बसण्याची आम्ही मानसिकता तयार केली असतानाच शरद पवारांनी जादू केली व आम्ही मंत्री झालो. परंतु कोरोना संकटामुळे राज्य आर्थिक अडचणीत आले आहे. महावितरणचे वीज बिलाचे कर्ज सुमारे ७२ हजार रुपये कोटींपर्यंत पोहोचले आहे. आपण ऊर्जामंत्री असताना ते १४ हजार कोटी रुपये होते. सवलतीचा निर्णय शासन घेईल; परंतु शेतकऱ्यांनी चालू वीज बिले भरून सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आंबेगाव शिरूर खेड या तालुक्यातील सीमेवरील गावांमध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. नजीकच्या काळामध्ये येथील पिण्याच्या पाण्याची योजना मार्गी लागावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. पाबळ येथील बाजार समितीच्या ओसाड पडलेल्या माजी सभापती शंकर जांभळकर, विद्यमान सभापती वसंतराव कोरेकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सुंदर इमारत व शेड उभारले आहे, असे वळसे-पाटील यांनी या वेळी सांगितले.
आमदार अशोक पवार म्हणाले की, मागील काळामध्ये बाजार समिती चुकीच्या लोकांच्या हातात गेल्याने समिती तोट्यात गेली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात बाजार समिती आल्यानंतर सर्व सभापती व संचालक आणि चांगले काम करीत बाजार समिती फायद्यात आणली आहे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, या मताचा मी असून त्याबाबत कुठलाही प्रादेशिक भेदभाव करीत नाही. पाण्यासाठी शेतकरी महत्त्वाचा असून हेड, टेल असा कुठलाही भेदाभाव नाही. महाविकास आघाडी म्हणून तालुक्यामध्ये काँग्रेस व शिवसेना यांना बरोबर घेऊन काम करीत असल्याचे आमदार पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
२६ शिक्रापूर
पाबळ येथे बाजार समितीच्या उपबाजार यार्डाच्या उद्घाटनप्रसंगी दिलीप वळसे-पाटील, अशोक पवार, पोपटराव गावडे व इतर.
260921\20210926_135836.jpg
????? ?????? ???? ?????